इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
एकदाच निश्चय करून टाका
भावनेच्या आणि उत्साहाच्या आहारी जाऊन आपल्या शक्तीपेक्षा अधिक कामाचे ओझे डोक्यावर घेण्याची आपली संवय असते. मग काय होते? त्याखाली चिरडून जाण्याचा प्रसंग येतो. थकवा येतो. ठेचा लागतात, झोक जाऊ लागतो. अशा वेळी डोळ्यामध्ये आसवे आणून परमेश्वरापुढे प्रार्थना करून त्याच्याकडे मदतीसाठी याचना करावी लागते. पण त्यापेक्षा जर का आपण एकदाच निश्चय करून टाकला की, शांत मनाने, स्थिर चित्ताने व कोणत्याही प्रकारचा ताण न येता जेवढे काम करता येईल तेवढेच काम अंगावर घ्यावयाचे, अधिक नाही; आणि थकवा वाटू लागताच, विश्रांतीची गरज वाटताच काम त्वरित दूर ठेवून, स्वस्थ बसून, शांत चित्त करून विश्रांती घ्यायची. असे केले तर या साध्या सोप्या उपायाने जे काही साध्य होईल ते आसवे गाळून प्रार्थना केल्यानेही साध्य होईल, असे सांगता येणार नाही.