इंडिया दर्पण – विचार पुष्प – दुःख आले तर हे करा
कोणा शस्त्रवैद्याकडे जाऊन शस्त्रक्रिया करून घेण्याचा प्रसंग आला असता, शस्त्रक्रिया करतांना होणाऱ्या दुःखाबद्दल त्या वैद्यास दोष देण्याचा वेडेपणा सहसा कोणी करीत नाही. पण दुसऱ्या तशाच प्रसंगी तसा दोष देण्याचा वेडेपणा पुष्कळांच्या हातून घडतो.
दुःखाने व मानसिक अस्वास्थ्याने बेजार झालेला कोणी आपल्या स्नेह्याकडे जाऊन, दुःख निवेदन करून तो भार हलका करण्याची आशा बाळगतो, त्या वेळी ‘या सर्व दुःखाचे मूळ बाहेर नाही, स्वतःमध्येच आहे’ असे सांगितल्याबद्दल त्या स्नेह्यावर सहानुभूतिशून्यतेचा आरोप केला जातो.
वास्तविक तुम्ही तुमच्या दुःखांचा जितका अधिक विचार व उच्चार करता, तितकी ती वाढतच जातात. म्हणून दुःखाचा विचारच सोडून देण्याचा अभ्यास करणे योग्य.