इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर अशक्यही शक्य होईल..
सत्यसाधना, दयाभावना व प्रकृतिमातेची आज्ञा यांच्याबाबतीत ‘अशक्य’ हा शब्द तुम्ही उच्चारता कामा नये. बरोबरीची सर्व मंडळी थकून ‘अशक्य’ म्हणून हातपाय गाळून जेथे स्वस्थ बसतील व तुम्ही एकटेच उरले असाल, तेथेच व तेव्हाच तर तुमच्या अंगच्या तेजाचे दर्शन घडणार. याचवेळी प्रयत्नांची शिकस्त करून तुम्ही अशक्यास शक्य बनविले पाहिजे.
कोणाचाही सल्ला वा सहानुभूतीचा शब्द यांची आशा न धरता, साहस करून पुढे घुसले पाहिजे. कारण तुमच्यामधील सुप्त शक्ती अशाच वेळी जागृत होणार.
परमेश्वरी कृपा व मार्गदर्शन मिळण्याचा सोन्यासारखा प्रसंग हाच असतो. अनंत आकाशात सुवर्णाक्षरांनी पुरुषार्थी जीवनाची रेखाटणी अशाच प्रसंगी होत असते. संपूर्ण इच्छाशक्ती मागे उभी असेल, तर उन्नतीच्या मार्गात ‘अशक्य’ असे काही असणार नाही.