इंडिया दर्पण – विचार पुष्प – आपला मार्गदर्शक गुप्त आहे
तुमच्या अंतरंगी बसून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला स्पष्टपणे सूचना तर “तो” देतच असतो. मात्र आपण त्या ऐकत नाही. कधी मुद्दामच त्याकडे दुर्लक्ष करतो. वास्तविक त्या आज्ञा ऐकून त्या तंतोतंत पाळणे हेच तर आपल्या जीवनाचे सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट आहे. त्याचे सतत स्मरण राखणारास तो कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ देणार नाही. “तो” त्याचे सतत रक्षण व मार्गदर्शन करीत राहील. आपला मार्गदर्शक गुप्त आहे.
अगदी मंद आवाजात कुजबुजल्याप्रमाणे तुमच्या कानाशी येऊन तो नेहमी कांही ना काहीतरी सांगून जात असतो. जगात अखंडपणे चाललेली धमाल जर आपल्या कानात जागा अडवून बसली नसेल, दुसऱ्याच्या संभाषणाकडे आपले कान जर टवकारलेले नसतील, तर हा ‘आतील आवाज’ आपणाला निश्चितच ऐकू येऊ शकेल.