नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महत्त्वाच्या पदावरील काही व्यक्ती संविधानाबाबत अनभिज्ञ आहेत, याबद्दल व्यथा आणि निराशा व्यक्त केली. ”त्यांना भारत काय आहे, माहित नाही, त्यांना आपले राष्ट्रीय हित कशात आहे, याची कल्पना नाही. या देशाला 5000 वर्षांहून अधिक जुन्या संस्कृतीचा इतिहास आहे,” त्यांनी नमूद केले.
देशाबाहेर असलेल्या प्रत्येक भारतीयाला या देशाचा राजदूत असायला हवे, असे अधोरेखित करून उपराष्ट्रपती म्हणाले, “संवैधानिक पद धारण करणारी एखादी व्यक्ती याच्या नेमके विरुद्ध वर्तन करत आहे, ही गोष्ट किती वेदनादायक आहे!” ते आज नवी दिल्लीत संसद भवन येथे राज्यसभा इंटर्नशिप (अंतर्वासिता) कार्यक्रमाच्या तिसऱ्या तुकडीला संबोधित करत होते. उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, “आपण जर खरे भारतीय असू, जर आपला आपल्या देशावर विश्वास असेल, तर आपण देशाच्या शत्रूंची बाजू कधीच घेणार नाही.आपण सर्वजण देशासाठी ठामपणे उभे राहू.”
अशा गंभीर प्रसंगी नागरिकांच्या मौनाबाबत चिंता व्यक्त करत धनखड म्हणाले, “आपण गप्प राहून अशा गैर वर्तन करणाऱ्यांना समर्थन देतो. तुमच्यापैकी प्रत्येकाने बोलले पाहिजे. आपण राष्ट्रवादाप्रति असलेल्या समर्पणाशी कधीच तडजोड करणार नाही. राष्ट्रवादाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य हवे, कुटुंबापेक्षा, स्वार्थापेक्षा, राजकारणापेक्षा तो सर्वश्रेष्ठ असायला हवा,” ते पुढे म्हणाले.
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, “राजकीय पक्षांनी कायद्याच्या कक्षेत, संविधानाच्या कक्षेत राहून राजकारण करायला हवे. ते सरकारवर टीका करू शकतात, परंतु ते शत्रूंच्या सहयोगाने देशाचे नुकसान करू शकत नाहीत. हा एकच प्रसंग नाही. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, भारतीय संसदेशी, आणि पर्यायाने भारतीय राष्ट्रवाद आणि देशाशी जोडणारी तुमच्यातील प्रेरणा जागवणे, हे राज्यसभा इंटर्नशिप कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.