नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी १९ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजप नायडू यांना पुन्हा संधी देणार का, याबाबत चर्चा रंगली होती. परंतु, भाजप नायडू यांना पुन्हा संधी देण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी मुख्तार अब्बास नकवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही भूषवले आहे. सध्या त्यांच्यावर केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे. नकवी यांचे जन्मस्थान अलाहाबाद हे आहे. त्यांनी आपले शिक्षण अलाहाबाद विश्वविद्यालयातून पूर्ण केले आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला आहे.
नक्वी हे इंदिरा गांधी यांना पराभूत करणारे समाजवादी नेता राजनारायण यांच्या जवळचे व्यक्तिमत्व होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आतापर्यंत भाजपच्या तिकिटावर दोन वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. तसेच तीन वेळा ते भाजपकडून राज्यसभा सदस्य राहिले आहेत. १९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता.
सद्यस्थितीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी भाजपच्यावतीने सध्या एकही मुस्लिम खासदार नाही. त्यामुळे राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ होती. मात्र, भाजपने दलित समाजातील उमेदवार द्रोपदी मूर्मू यांनी संधी दिली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी मुस्लिम व्यक्तीचे नाव निश्चित झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी असतो. निवडणुकीवेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
Vice President election BJP Candidate