नवी दिल्ली(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू केली आहे. तयारीच्या कामांची पूर्तता झाल्यानंतर भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूक वेळापत्रकाची घोषणा शक्य तितक्या लवकर केली जाणार आहे.
दरम्यान दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नव्या उपराष्ट्रपतीसाठी नव्या चेह-याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची बिहारच्या एका बड्या नेत्याने भेट घेतली असल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
राज्यसभेचे खासदार असलेले तथा केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हे नाव या पदासाठी पुढे आले असून त्यांनीच नड्डा यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते. रामनाथ ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकुर यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्पुरी ठाकुर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.