विशेष प्रतिनिधी, मुंबई
अन्न, वस्त्र, आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी नोकरी, व्यवसाय किंवा काम करावे लागते. काही नोकऱ्या मात्र अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि आश्चर्यकारक अशा असतात. रोजगाराच्या शोधार्थ अनेक लोक आपली घरे, शहरे आणि अगदी देश सोडून परदेशातही जातात. काही लोक उन्हामध्ये काम करतात, तर काही लोक मोठमोठे कारखाने आणि कंपन्यांमध्ये काम करून आपले जीवन जगतात तसेच घर संसार चालवतात. देशात आणि परदेशात विविध प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत. परंतु काही नोकरींबद्दल जाणून घेतल्यास आपण आश्चर्यचकित व्हाल. कोणत्या आहेत त्या नोकर्या त्याविषयी जाणून घेऊ या…
ट्रेन पुश जॉब
जपानमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे बर्याच वेळा ट्रेनचे दरवाजे बंद होत नाहीत. त्यामुळे येथे नोकरीसाठी नेमलेले लोक गर्दीला बाहेर ढकलून रेल्वे दरवाजा बंद करण्यात मदत करतात. म्हणजेच केवळ दरवाजा बंद करण्याची नोकरी.
सापाचे विष काढणे
विषारी सापांचे विष बाहेर काढणे आणि गोळा करणे सोपे काम नाही. पण काही लोकांना ही नोकरीया मिळते. हे काम करणाऱ्यांना सापाचे विष काढतेवेळी प्रचंड काळजी घ्यावी लागते. या विषाचा उपयोग अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
कुत्र्याचे खाद्य टेस्ट करणे
आपल्याला थोडेसे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. कुत्र्याचे खाद्य उत्पादन करणारी कंपनी या खाद्याची चाचणी घेण्यासाठी लोकांना कामावर ठेवतात. या व्यक्तींना कुत्रा फूड टेस्टरमध्ये काम करावे लागते. उत्पादनाची चाचणी करणे, त्याचा स्वाद घेणे, उत्पादन कसे झाले आहे ते सांगणे ही जबाबदारी त्यांच्यावर असते.
झोपण्याचे काम
हो चक्क झोपण्याचीही नोकरी दिली जाते. या लोकांना केवळ झोपायचे असते. त्या बदल्यात त्यांना उत्तम पैसे मिळतात. अनेकदा संशोधक अशा प्रकारे काही व्यक्तींना झोपण्यासाठी बोलावतात. हॉटेलमधील खोल्या आणि बेडसची गुणवत्ता माहिती करुन घेण्यासाठी व्यावसायिक अशा लोकांना झोपायचे काम देतात. फिनलँडमध्ये असे अनेकदा होते.
रडण्याचे काम
केवळ परदेशातच नाही, तर भारतातही काही ठिकाणी महिलांना रडण्याच्या कामावर ठेवले जाते. त्या फक्त रडण्याचे काम करतात. जेव्हा घरात कुणी मृत होते, तेव्हा त्या शोक करतात त्यासाठी त्यांना घरी बोलविले जाते आणि त्यांना केवळ रडण्यासाठी पैसे दिले जातात.