मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाले आहे. तसेच, मध्य रेल्वेवरील सेवेवरही परिणाम जाला आहे. या सर्व परिस्थितीची दखल घेत आणि हवामान विभागाचा इशारा पाहून मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवार, २० जुलै) मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.