नवी दिल्ली – आधुनिक जीवनशैलीची देणगी असलेल्या मधुमेहाचे (डायबेटिस) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या रुग्णांना दररोज विविध प्रकारची औषधे घेणे आवश्यक असते. त्यातच औषधांच्या किंमती भरमसाठ असल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला येतात. मात्र, आता मधुमेहींसाठी अत्यंत गोड बातमी आहे. कारण, त्यांना लागणारी १२ औषधे आता स्वस्त दरात मिळणार आहेत.
औषध मूल्य नियामक संस्थेने (एनपीपीए) भारतातील मधुमेहींना ही गोड भेट दिली आहे. मधुमेहाच्या उपचारासाठी वापरात येणाऱ्या १२ जेनेरिक औषधांची जास्तीत जास्त किंमत निश्चित केली आहे. या औषधांमध्ये ग्लिमेपाइयाइड टॅबलेट, ग्लुकोजची सुई आणि इन्सुसिन सोल्युशनचा समावेश आहे.
मधुमेहासारख्या आजारावर स्वस्त उपचार प्रत्येक भारतीयाला मिळावे. यासाठी एनपीपीएने मधुमेहाच्या इलाजासाठी वापरण्यात येणार्या १२ औषधांची कमाल किंमत निश्चित केली आहे. त्याअंतर्गत ग्लिमेपाइराइड एक एमजीची एक टॅबलेटची कमाल किरकोळ किंमत आता ३.६ रुपये असेल. तर दोन एमजी टॅबलेटची किंमत ५.७२ रुपये असेल. अशी महिती एनपीपीएतर्फे ट्विट करून देण्यात आली आहे.
२५ टक्के ट्रेन्थ असलेल्या एक एमएल ग्लुकोज इंजेक्शनची किंमत १७ रुपये, तर ४० आययू/एमएल स्ट्रेन्थ असलेल्या एक एमएल इन्सुलिन इंजेक्शनची किंमत १५.९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. याप्रमाणे ४० आययू/एमएल स्ट्रेन्थ असलेल्या एक एमएल इंटरमिडिएट अॅक्टिंग (एनपीएच) सोल्युशन इन्सुलिन इंजेक्शनची किंमत १५.०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ४० आययू/एमएल स्ट्रेन्थच्या ३०ः७० प्रीमिक्स इन्सुलिन इंजेक्शनची किंमत १५.०९ रुपये प्रति इंजेक्शन निश्चित करण्यात आली आहे.
एनपीपीए म्हणाले, ५०० एमजी मेटाफॉर्मिन इमीडिएट रिलिज टॅबलेटची किंमत प्रति टॅब १.५१ रुपये तर ७५० एमजी टॅबलेटची किंमत ३.०५ रुपये असेल. एक ग्रॅम स्ट्रेन्थ असलेल्या मेटफॉर्मिन टॅबलेटची कमाल किंमत ३.६१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. मेटफॉर्मिन कंट्रोल रिलिज एक ग्रॅम प्रति टॅबलेटची जास्तीत जास्त किंमत ३.६६ रुपये, तर ७५० एमजी आणि ५०० एमजी टॅबलेटची किंमत प्रत्येकी २.४० रुपये आणि १.९२ रुपये प्रति टॅबलेट असेल.