मुंबई – क्रिकेट विश्वात सर्वात यशस्वी समजल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएलच्या पुढील हंगामात दहा संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी दोन नव्या फ्रेंचाइजींची घोषणा केली. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवे संघ आयपीएलमध्ये दिसणार आहेत. नव्या संघांचा समावेश झाल्यामुळे आता आयपीएल स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच खेळाडू आणि सामन्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन नव्या संघाचा समावेश झाल्याने खेळाडूंसह बीसीसीआयसुद्धा मालामाल होणार आहे.
नव्या संघांची किंमत
गोएंका ग्रुपने ७०९० कोटी रुपयांना लखनऊची फ्रेंचाइजी खरेदी केली आहे. तर सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सने ५६२५ कोटी रुपयांमध्ये अहमदाबाद फ्रेंचाइजी खरेदी केली आहे. यापूर्वी गोएनका ग्रुपने आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये रायझिंग सुपर जाएंट्स फ्रेंचाइजी खरेदी केली होती.
यापूर्वीही दहा संघांचा समावेश
आयपीएलच्या एका हंगामात दहा संघ खेळण्याची ही प्रथम घटना नाहीय. यापूर्वी २०११ मध्ये दहा संघांचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला होता. पुणे वॉरियर्स आणि कोची टस्कर्स हे दोन संघ खेळले होते. २०१२ मध्ये कोचीवर बंदी घालण्यात आली होती. पुढील दोन हंगामात म्हणजेच २०१२ आणि २०१३ मध्ये नऊ संघ सहभागी झाले होते. २०१४ मध्ये आयपीएल पुन्हा आठ संघावर आली.
पुढील हंगामात काय बदल होणार?
१) दहा संघांचा समावेश केल्यामुळे आयपीएलचा फॉरमॅट बदलेल. २०११ च्या फॉरमॅटनुसार यंदा सामने होतील. परंतु याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. संघ वाढले तर फॉरमॅट बदलावा लागेल असे बीसीसीआयने यापूर्वीच सांगितले आहे. २०११ च्या फॉरमॅटनुसार दहा संघांना दोन गटात विभागले जाईल.
२) सामन्यांची संख्या वाढणार आहे. २०१४ मध्ये आठ संघांच्या फॉरमॅटमध्ये परतल्यानंतर राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये सामने खेळविण्यात आले होते. या फॉरमॅटमध्ये एकूण ६० सामने खेळले जातात. ५६ सामने लीगमध्ये आणि चार सामने प्लेऑफमध्ये खेळविले जातात. आता दोन संघ वाढल्यामुळे ७४ सामने खेळविले जातील. एक संघ १४ सामने खेळेल. परंतु फॉरमॅट बदलेल.
३) संघ वाढल्याने खेळाडूंची संख्याही वाढणार आहे. सध्या एका संघात २५ खेळाडू निवडण्याची परवानगी आहे. दोन संघांचा समावेश झाल्यानंतर २५-२५ च्या हिशेबानुसार एकूण ५० खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील. नव्या खेळाडूंचा समावेश झाल्यानंतर स्पर्धा आणखी रोमांचक होण्यास मदत मिळेल.
४) नव्या संघांचा समावेश झाल्याने स्थानिक क्रिकेट खेळणार्या खेळाडूंचाही फायदा होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत एका संघात फक्त आठ परदेशी खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी आहे. दोन नव्या संघात १६ परदेशी खेळाडू वाढतील. परंतु देशांतर्गत क्रिकेट खेळणारे ३४ खेळाडू असतील. अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघालाही नवनवे खेळाडू मिळतील.
५) यात परदेशी खेळाडूंचाही फायदा होणार आहे. परदेशी खेळाडूंची मर्यादित संख्या असल्याने फ्रेंचाइजीसुद्धा काही मर्यादित खेळाडूंनाच संघात घेऊ शकत होत्या. आता १६ नवे परदेशी खेळाडू खरेदी करता येणार आहेत. ज्यो रूट आणि अॅरॉन फिंचसारख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या हंगामात विक्री न झालेल्या खेळाडूंनाही संधी मिळणे निश्चित मानले जात आहे.
६) दोन नव्या संघांना नवे प्रशिक्षक लाभतील. खेळाडूंनाही त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणार आहे.
७) दोन नव्या संघांचा समावेश झाल्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे. मोठा लिलाव प्रत्येक तीन वर्षांनंतर घेतला जातो. मागच्या वेळी २०१८ मध्ये मोठा लिलाव झाला होता. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी लीगमध्ये पुनरागमन केले होते. या लिलावात १८२ स्लॉटसाठी १३ देशांच्या ५७८ खेळाडूंना निवडण्यासाठी आठ संघांनी बोली लावली होती. पुढील वर्षी आणखी दोन संघांचा समावेश होणार असल्याने मोठा लिलाव होण्याची प्रबळ शक्यता आहे.
८) नवी रिटेंशन पॉलिसीसुद्धा पुन्हा आजमावली जाणार आहे. किती खेळाडूंना रिटेन केले जाऊ शकते याचा अंदाज घेता येणार आहे. अशा खेळाडूंना आधीच आपल्या संघात ठेवले जाण्याची शक्यता आहे. एक दोन दिवसात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
९) बीसीसीआयलासुद्धा अनेक फायदे होणार आहेत. दोन नव्या संघांमुळे ३५०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे हे मंडळाला आधीच ठाऊक होते. परंतु लखनऊ फ्रेंचाइजीकडूच बीसीसीआयला दुप्पट रक्कम मिळणार आहे. नव्या संघांकडून बीसीसीआयला १२,७१५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. प्रक्षेपणाचे हक्क (ब्रॉडकास्टर) वितरित केल्यानंतर बीसीसीआय आणखी मालामाल होणार आहे.
१०) दोन नव्या संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यातून चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे. कोरोनाच्या काळात चाहत्यांना घरी बसून सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.