मुंबई – शेअर बाजार नियमाक संस्था सेबीने उद्योगपती वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर दोन कंपन्यांना एकूण ७५ लाखांचा दंड बजावला आहे. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीडच्या शेअरमध्ये इनसाइडर ट्रेडिंगवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. २०१७ मधील या प्रकरणात धूत यांच्यासह व्हिडिओकॉन रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि इलेक्ट्रोपार्टस प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांचा समावेश आहे.
या कंपन्यांकडे व्हिडिओकॉनच्या अप्रकाशित किमतीशीसंबंधित संवेदनशील माहिती (यूपीएसआय) होती. त्यानंतरसुद्धा त्यांनी शेअर बाजारात करार केले,असा आरोप करण्यात आला. व्हिडिओकॉनच्या कर्जाच्या खात्याला देना बँक एनपीए कर्जाच्या श्रेणीत टाकणार होती. ती यूपीएसआय असल्याने या माहितीचा व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीवर परिणाम होत होता. १ मार्च २०१७ ते ९ मे २०१७ असा माहितीचा कालावधी होता. यादरम्यान दोन्ही कंपन्यांनी आपले शेअर्स गहाण ठेवले किंवा इतर कंपन्यांकडे हस्तांतरित केले. व्हिडिओकॉनचे अधिकृत प्रतिनिधी वेणूगोपाल धूत यांच्याकडे संवेदनशील माहिती असताना त्यांनी दोन्ही कंपन्यांकडून व्यवसाय केला.