नाशिक – गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरातील विविध उपनगरांमध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत : रस्त्यावर आणि पार्किंग मध्ये लावलेली वाहने चोरण्याचे प्रकार गेल्या सहा महिन्यात खूपच वाढले असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना फारसे यश आलेले दिसत नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे आणि कडक लॉकडाऊनमुळे शहरातील रहदारी बंद होती. आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याने हळुहळु रहदारी पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील नागरिक खरेदीसाठी व अन्य कामांसाठी शहरातील बाजारपेठेतील रस्त्यालगत आपली वाहने उभी करतात. तसेच काही वाहने पार्किंग मध्ये देखील उभी असतात. परंतु या वाहनांना विशेषतः दुचाकींना चोरट्यांनी आपले लक्ष्य बनविले असून वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या वर्षी पिढीच्या तुलनेत यंदा वाहनचोरीचे प्रकार अधिक झाले आहेत.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 12 हजार रुपयांची मोटारसायकल चोरीची नोंद झाली आहे. या प्रकरणातील फिर्यादीने मोटारसायकल देवळाली कॅम्पमधील एका महाविद्यालयाच्या कंपाऊंड भिंतीजवळ उभी केली होती, त्यावेळी काही अज्ञात व्यक्तीने डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने चोरट्याने चोरून नेली.
यावर्षी मे अखेरपर्यंत शहरातील विविध भागातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह 141 वाहनांची चोरी झाली आहे. शहर पोलिसांना चोरीला गेलेल्या केवळ 22 वाहनांचा शोध घेण्यात व चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश मिळविले.
गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत पोलिसांनी 143 चोरीच्या घटना नोंदवल्या असून पोलिसांना 20 टक्के शोधणे शक्य झाले. शहरातील वाहन चोरीच्या प्रकरणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे शहरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. कोविड -१९ बंदीच्या कालावधीत पोलिस रस्त्यावर आणि मोठ्या संख्येने असूनही दररोज जवळपास एक वाहन शहरातील किंवा इतर भागातून चोरीला जात आहे.
अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी माहिती दिली की, महिनाभरापुर्वी अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( 24, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आहेत. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोटारसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेत आहेत.