मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईचा फटका वाहनधारकांच्या खिशाला बसणार आहे. केंद्र सरकारने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर विमा प्रीमियमचे दर वाढवले आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रीमियमवर ७.५ टक्के सूट असेल. आता ३० किलोवॅट क्षमतेच्या ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ५ हजार ५४३ रुपये असेल. तर, ३० किलोवॅट ते ६५ किलोवॅटमधील ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ९ हजार ४४ रुपये असेल. ६५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या ई-कारला आता तीन वर्षांच्या प्रीमियमसाठी २० हजार ९०७ रुपये द्यावे लागतील.
चारचाकी वाहनांसाठी नवीन दर
रु. २ हजार ०९४ : १००० सीसी इंजिन क्षमतेच्या खाजगी कारसाठी, पूर्वी २०७२ रु.
रु. ३ हजार ४१६: १००० ते १५०० सीसी इंजिनच्या खाजगी कारसाठी पूर्वी ३ हजार २२१ रु.
रु. ७ हजार ८९० : १५०० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या कारसाठी त्यांचे दर कमी करण्यात आले, पूर्वी ७ हजार ८९७ रुपये मोजावे लागत होते.
दुचाकींसाठी नवीन दर
रु. १ हजार ३६६ : १५० सीसीपेक्षा जास्त परंतु ३५० सीसीपेक्षा कमी दुचाकी वाहनांसाठी
रु. २ हजार ८०४ : ३५० सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय
ज्या वाहन मालकाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे त्यांना ही सुविधा मिळते की त्या वाहनामुळे झालेल्या अपघातात कोणत्याही थर्ड पार्टीचे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्रयस्थ पक्षाला क्लेम देते. वाहन अपघातामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. या विम्याशिवाय रस्त्यावर वाहन नेण्यास परवानगी नाही.
नवे दर १ जूनपासून होणार लागू
अधिसूचनेनुसार, थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियमचे नवीन दर १ जून २०२२पासून लागू होतील. यापूर्वी २०१९ – २० या वर्षासाठी ही वाढ करण्यात आली होती. यानंतर, कोरोना महामारीमुळे दोन वर्षे प्रीमियममध्ये कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी, हे दर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) अधिसूचित केले होते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने विमा नियामकाशी सल्लामसलत करून थर्ड पार्टी दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.