मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी काळात थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियमच्या किंमतींमध्ये वाढ होऊ शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार निर्णय झाल्यास १ एप्रिलपासून कार आणि दुचाकींच्या विम्यामध्ये वाढ होणार आहे. प्रस्तावित सुधारित दरांनुसार, २०१९ – २० मधील २ हजार ७२ रुपयांच्या तुलनेत १००० सीसी असलेल्या खाजगी कारसाठी २ हजार ९४ रुपये त्याचप्रमाणे, १००० सीसी ते १५०० सीसीपर्यंतच्या खाजगी गाड्यांना ३ हजार २२१ रुपयांच्या तुलनेत ३ हजार ४१६ रुपये, तर १५०० सीसीवरील कार मालकांना ७ हजार ८९० रुपयांऐवजी ७ हजार ८९७ रुपये प्रीमियम भरावा लागेल.
दुचाकींच्या बाबतीत, १५० सीसी ते ३५० सीसी दरम्यानच्या वाहनांसाठी प्रीमियम १ हजार ३६६ रुपये असेल, तर ३५० सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम २ हजार ८०४ रुपये असेल. सुधारित इन्श्युरन्स प्रीमियम कोव्हीड १९ महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर १ एप्रिलपासून लागू होईल. या निर्णयामुळे वाहन चालकांना आता इन्श्युरन्ससाठी जास्त पैसावे मोजावे लागणार आहेत.