नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर कोणतेही जुने वाहन खरेदी करत असाल, तर वाहनासह वाहनाचा विमासुद्धा तुमच्या नावावर करून घ्या. अन्यथा वाहनाचे नुकसान झाल्यास किंवा ते चोरी झाल्यास विम्याचा लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही. अशाच एका प्रकरणात ग्राहक आयोगाने वाहन चोरी झाल्यामुळे वाहनधारकाला विम्याचा लाभ देण्यास नकार दिला आहे. दिल्ली राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने विमा कंपनीच्या बाजूने निकाल देत सांगितले, की विमाधारक आणि वाहनधारक एकच व्यक्ती असणे आवश्यक आहे. तेव्हाच विम्याचा दावा केला जाऊ शकतो आणि त्याचा लाभ दिला जाऊ शकतो. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सहगल आणि अनिल श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने जवळपास नऊ वर्षे जुना जिल्हा ग्राहक निवारण मंचाने दिलेला निर्णय रद्द करून हा निर्णय सुनावला आहे.
राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या जुन्या निर्णयाचा हवाला देताना खंडपीठाने सांगितले, की विमाधारक आणि वाहन मालक एकच व्यक्ती नसेल, तर नुकसान झाल्यानंतर विम्याचा लाभ दिला जाऊ शकत नाही. या प्रकरणात वाहन तक्रारकर्त्याच्या नावावर आहे. तर वाहनाचा विमा जुन्या मालकाच्या नावाने जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चोरी झाल्यानंतर दावा फेटाळण्याचा विमा कंपनीचा निर्णय योग्यच आहे. विमा कंपनीने आपल्या नावाने विमा जारी करण्याची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक होते, हा तक्रारकर्त्याचा दावाही आयोगाने फेटाळून लावला आहे. आयोगासमोर दाखल याचिकेनुसार, ऑक्टोबर २०१० मध्ये तक्रारकर्त्या दीपिका यांचे वाहन चोरी झाले होते. वाहन चोरी झाल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. संबंधित वाहनाचा विमा जुन्या मालकाच्या नावावर असल्याने दावा दिला जाऊ शकत नाही, असे सांगत विमा कंपनीने दावा फेटाळला होता.