इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिवृष्टी किंवा पुरामुळे वाहनांचे नुकसान होते. पण, जर तुम्ही वाहन विमा घेतलेला असेल तर तुम्हाला लाभ मिळतो. तो नेमका काय असतो याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे आता आपण त्याविषयी जाणून घेऊया…
फ्लड इन्शूरन्स म्हणजेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई. तुम्ही वाहन विमा घेतला असेल आणि पुरात वाहनाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला विमा संरक्षण अंतर्गत भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. तसेच पूर प्रमाणे वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. वित्त हानीमध्ये वाहनांच्या नुकसानाचाही समावेश असतो.
पुराच्या वेळी रस्त्यावर उभी असलेली कित्येक वाहनं पाणी तुंबल्याने खराब होतात. वाहनांचं इंजिन खराब होतं. त्यानंतर ही वाहनं दुरुस्त करण्यासाठी वाहन धारकांना खूप पैसे खर्च करावे लागतात. अनेक मध्यमवर्गीय वाहनधारक तर अशा वेळी कार दुरुस्त करावी की करू नये ? या विवंचनेत असतात. कारण त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. या वर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापूर आला होता. आता काहीशी तशीच परिस्थिती बंगळुरूसह देशाच्या अनेक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वाहनं पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत.
अशा वेळी एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती असायला हवी की, जर पूर किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमची कार खराब झाली तर वाहन इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्याची भरपाई देईल का? त्यामुळे वाहन विम्याबाबतची सर्व माहिती माहिती असणे आवश्यक आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान विमा कंपन्या भरून काढतात. पण काही अटी आणि शर्तीही त्यासोबत जोडण्यात आल्या आहेत. या अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतरच विमा कंपनी नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेते.
वाहन विमा घेतला असेल आणि पुरात वाहनाचे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला विमा संरक्षण अंतर्गत भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. अनेक प्रकरणांमध्ये, कंपन्या थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीवर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे डॅमेज क्लेम देत नाहीत. जर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीसह कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त कव्हरेज घेतलं असेल ज्यामध्ये कारचं इंजिन आणि इतर उपकरणं देखील समाविष्ट असतील, तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देते. याचाच अर्थ तुम्हाला केवळ इन्शूरन्सवर क्लेम मिळणार नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी अतिरिक्त कव्हरेज घ्यावं लागेल, ज्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील
वाहनाचे नुकसान झाल्यास तुम्हाला कोणते प्रकारचे फायदे मिळतात ते जाणून घ्या. पुराचं पाणी जर इंजिनमध्ये गंल, तर इंजिन पूर्णपणे किंवा त्यातील काही पार्ट्स खराब होऊ शकतात. याच्या भरपाईसाठी तुम्ही आपल्या विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. कारमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू असतात. त्यातही पाणी गेल्यास त्या खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही फ्लड डॅमेज कव्हरनं भरपाई करू शकता.
पुराचं पाणी कारच्या आत गेल्यास इंटिरिअरही खराब होऊ शकतं. कारच्या आतील सिट्स, कारपेट आणि फर्निशिंगचं सामान खराब होऊ शकतं. याच्या भरपाईसाठीदेखील तुम्ही विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. तसेच गिअरबॉक्समध्ये पाणी गेल्यास तेदेखील खराब होऊ शकतं. यामुळे गाडीचा गिअर काम करणार नाही. सोबतच अन्य समस्याही उद्भवू शकतात. याचीदेखील भरपाई तुम्हाला विमा कंपनीकडून मिळू शकते.
तुमची कार पावसात किंवा पाण्यात अडकली असेल तर पुश स्टार्टिंगनं कधीही कार सुरू करू नका. बॅटरी लगेच डिस्कनेक्ट करा आणि टो करून गाडी वर्कशॉपपर्यंत आणावी, पाण्यात गाडी कायम खालच्या गिअरमध्ये चालवा. तसंच एकच स्पीड कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातून निघण्यापूर्वी कारचे ब्रेक तपासून पाहा. पुराच्या परिस्थितीतून बाहेर आल्यावर कारचे ब्रेक तपासा. पाण्याची पातळी गाडीपेक्षा कमी झाली तरी त्वरित ती सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
वास्तविक वाहनाचं जे नुकसान होईल त्यावर विमाधारकाला क्लेमची (दाव्याची) रक्कम द्यावी लागते. मात्र ही रक्कम वाहनासाठी निश्चित केलेल्या, विमा उतरवलेल्या घोषित मूल्याच्या आधारावर निर्धारित केली जाते. समजा तुमची कार पूर्णपणे खराब झाली आणि ती कार दुरुस्तीयोग्य नसेल तर कंपनी तुम्हाला विम्याचे पूर्ण पैसे देते. त्यामुळे काळजी करू नका मात्र योग्य काळजी घ्या.
Vehicle Insurance Claim Flood Heavy Rainfall