नाशिक : दैनंदिन आहारातील कोमजलेला भाजीपाला रसायनात बुडवून टवटवीत करुन बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र त्या मागची सत्यता पडताळल्यानंतर तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. एका ऑरगॅनिक कंपनीच्या मार्केटिंग प्रतिनिधिने आपल्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी शेतकऱ्याच्या बांदावर प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडिओत दाखवण्यात आलेला दैनंदिन भाजीपाला नसून काँग्रेस गवत व गणेशोत्सवात वापरण्यात येणारा आघाडा असल्याचे समोर आले आहे. शिळा किंबहुना कोमजलेला दैनंदिन भाजीपाला एका विशिष्ट रसायनात बुडवून तो बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा व्हिडिओ सर्वच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यापारी वर्ग सर्वसामान्यांची फसवणूक करत असून भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावा असे चित्र त्या व्हिडिओतून वायरल केले जात आहे. या मागची सत्यता पडताळण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली असून त्यात त्यांना यशही मिळाले आहे.
सेव्ह इको ऑरगॅनिक या मार्केटिंग कंपनीचा हा व्हिडिओ असून त्या कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी आपल्या प्रॉडक्टचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. यात वापरण्यात आलेले द्रावण हे शेतातील उभ्या पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे सेव्ह ईको ऑर्गानिकचे डिस्ट्रीब्यूटर राजेंद्र बागुल व सचिन भारती यांनी सांगितले. या व्हिडिओ मागील सत्यता समोर आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, आर.डी. सूर्यवंशी, अविनाश दाभाडे, संदीप देवरे, प्रमोद पाटील आदींनी प्रयत्न केले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून सर्वत्र व्हायरल झालेला हा व्हिडिओ नाशिकचा नसून चांदवडचा आहे. चांदवड मधील एका शेतकऱ्याच्या बांधावर हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे.
…मगच करावा व्हायरल
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. कुठल्याही बातमीची सत्यता न पडताळता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जातो. त्यामागचे दुष्परिणाम बघितले जात नाही. चुकीच्या व्हायरलमुळे एखाद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्हायरल करण्यापूर्वी त्यामागची सत्यता पडताळून पाहणे अपेक्षित आहे.
– चंद्रशेखर साळुंखे,
आयुक्त अन्न व औषध प्रशासन (अन्न), नाशिक