मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेल्या तीन आठवड्यात जिवनावश्यक वस्तूंच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले काही महिने सतत महागाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता किराणा मालासह भाजीपाल्याचे दर घटल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
पाच राज्यातील निवडणुकांमुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ पोहोचत नसल्याचेही बोलले जात आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच घाऊक बाजारात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे पालेभाज्यां आणि फळभाज्यांचे दर काहीसे कमी झाले आहेत. नवीन बटाटा बाजारात दाखल झाल्याने बटाट्याचे दर १० रुपयांनी घसरले आहेत. सध्या बाजारात बटाटे 25 रुपये किलो प्रमाणे मिळत आहेत. तर लाल कांद्याचे दरही ५० रुपयांवरुन ३० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
विशेषतः सर्वच किराणा मालाच्या दरात घट झाल्याने गृहिणींनाही दिलासा मिळाला आहे. यात आणखी घसरण होण्याचे शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी सुमारे 80 रुपये किलोप्रमाणे मिळणारे सोयाबीन तेल आता सुमारे 75 रुपये झाले आहे. विविध प्रकारचा नवा तांदूळ बाजार देऊ लागल्याने तांदुळाच्या घरातही किलोमागे साधारणतः चार ते सात रुपयांनी घट झालेली दिसुन येते. इतर जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले दर मात्र दोन- तीन रुपयांनी का होईना कमी झाल्याने सामान्यांचे बजेट पूर्वस्थितीवर येण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. कारण तूरडाळ, गहू, शेंगदाणे, चनाडाळ, मूगडाळ, सोयाबीन तेल, साबूदाणा, साखर आदी वस्तूंमध्ये घट झाली आहे.
व्यावसायिक अमित जैन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी देशभरात पाऊसमान चांगले झाल्याने ज्वारी, तांदूळ, कडधान्य, डाळी वर्गीय पिके आणि तेलबिया वर्गीय पिकांचे उत्पन्न वाढले आहे. सहाजिकच घाऊक बाजारात मालाची आवक वाढल्याने किराणा मालाचे दर काहीसे कमी झाल्याने आमच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. देशभरातील खाद्यतेलाच्या किरकोळ किमती जागतिक बाजाराच्या तुलनेत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त आहेत. परंतु ऑक्टोबर 2021 पासून त्यामध्ये घट झाली आहे, देशभरातील प्रमुख घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 5-20 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत. शेंगदाणा तेलाची सरासरी किरकोळ किंमत 180 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आहे. पामतेल प्रतिकिलो 128.5 रुपये होते.
गेल्या वर्षाअखेर यंदा किमतीच्या तुलनेत शेंगदाणे आणि मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किमती 1 ते 3 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत, तर सोयाबिन आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आता 7 ते 8 रुपये प्रति किलो घट झाली आहे. कारण प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी प्रति लिटर 15-20 रुपयांची कपात केली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आयात शुल्कात कपात करणे आणि साठेबाजीला आळा घालणे यासारख्या निर्णयामुळे सर्व खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती कमी होण्यास मदत झाली आहे आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूमध्ये किलोमागे दोन ते पाच रुपयांनी घसरण झाली आहे. बाजारात मंदी असल्याने दर कमी आहेत, असे होलसेल किराणा व्यावसायिक राजेश शर्मा यांनी सांगितले.
बाजारात सध्या मंदीचे सावट असून दरात घसरण झाली आहे. निवडणूकीच्या घोषणा, अर्थसंकल्पातील अंदाज, पावसाचे वातावरण यावर बाजारपेठेतील अवस्था अवलंबून आहे. आगामी काळात किराणा मालाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. नवीन सरकारच्या स्थापनेमुळे बाजारात चैतन्य निर्माण होऊ शकते. महागाईपासून सुटका मिळण्याचे संकेत बाजारपेठेत मिळत आहेत. फळभाज्या आणि पालेभाज्यामध्ये सर्वाधिक घसरण टोमॅटोच्या दरात झाली आहे. तीन आठवड्यांपूर्वी सरासरी 75 रुपये किलो दर असलेल्या टोमॅटोचे दर आता 60रुपये किलोवर आले आहेत. त्याचवेळी बटाटा आणि कांदाही स्वस्त झाला आहे. असे असूनही जीवनावश्यक वस्तूंच्या कमाल आणि किमान किरकोळ किमतींमध्ये मोठी तफावत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे सध्याचे दर आणि घट असे
तांदूळ ( इंद्रायणी 60 ते 70 व कोलम 50 ते 55 ) फरक 10 ते 5 रुपयांनी घट
गहू 27 ते 30 ( फरक 5 ते 7 रुपये )
चणा डाळ 75 ते 80 ( फरक 5 रु. )
तूर डाळ 96 ते 99 ( फरक 3 रु. )
उडीद डाळ 102 ते 106 ( फरक 3 रु.)
मूग डाळ 99 ते 103 ( फरक 4 रु. )
मसूर डाळ 93 ते 95 ( फरक 2 रु. )
साखर 38 ते 42 ( फरक 4 )
शेंगदाणा तेल 180 ते 182 ( फरक 2 )
सोयाबिन तेल 147 ते 144 ( फरक 3 )
सूर्यफूल तेल 154 ते 155 ( फरक 1 )
पाम तेल 126 ते 128 ( फरक 2 रु. )
गूळ 55 ते60 ( फरक 5 रुपये )
बटाटे 25 ते 35 ( फरक 10 )
कांदा 45 ते 35 ( फरक 10 )
टोमॅटो 75 ते 60 ( फरक 15 रुपये )