मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने त्यावरुन राज्यात मोठे वादंग सुरू आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केले आहे तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरच खापर फोडले आहे. या सर्व प्रकरणात आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनीच मोठा खुलासा केला आहे.
अनिल अग्रवाल यांनी सांगितले आहे की, गुजरातबरोबरच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशकडूनही आम्हाला प्रस्ताव आला होता. गुजरातच्या युनिटमध्ये दुसरा प्लांट सुरू करण्याचाही आमचा विचार आहे. २०२४ पासून गुजरात युनिटमधून प्रॉडक्शनला सुरूवात होईल. या प्रकल्पासाठी मिळालेली जमीन ४०० एकर भागात पसरली आहे. तसेच अहमदाबादपासून प्रकल्पासाठीची जमीन जवळ आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर येणाऱ्या काळात एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप केवळ ४० हजाराहून कमी किंमतीत मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी वेदांता समूह ऍपल आयफोन्स आणि टीव्ही उत्पादनासाठी एक हब स्थापन करणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.
आयफोनच्या निर्मितीसाठी टाटा समूहदेखील स्पर्धेत आहे. सध्या टाटा समूहाची तैवानमधील कंपनी विस्ट्रॉनशी बोलणी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील चीनचा दबदबा मोडून काढण्यासाठी भारतीय कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेदांता फॉक्सवॉन प्रकल्पाची सुरुवात होत आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्लेच्या निर्मिती प्रकल्पात वेदांता समूह १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामुळे सुमारे १ लाख रोजगार तयार होतील.
सेमीकंडक्टर निर्मितीचं हब होण्यासाठी आणि जगाची गरज भागवण्यासाठी देशाला २ सेमीकंडक्टर हबची गरज असल्याचं अग्रवाल म्हणाले. दुसऱ्या हबसाठी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राने आम्हाला प्रस्ताव दिला आहे. गुजरातमधील प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर आम्ही दुसऱ्या प्रकल्पात लक्ष घालू. आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा भाग असेल. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील आमची गुंतवणूक देशभरातील उद्योगांची इकोसिस्टम तयार करेल. आम्ही, वेदांत-फॉक्सकॉन देशात गेल्या दोन वर्षांपासून साइट्सचे मूल्यांकन करत आहोत आणि अनेक राज्य सरकारांशी संवाद साधत आहोत आणि येत्या काही वर्षांत आमच्या प्रकल्पाच्या वाढीसाठी हे संभाषण सुरूच राहणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तळेगावमध्ये सेमीकंडर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाची घोषणा पूर्ण होण्यापूर्वी वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल अस्वस्थ होते. त्यांच्या मनात बरीच धाकधूक होती. अग्रवाल यांच्या जनसंपर्क व्यवस्थापक आस्था त्यागी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यागी यांनी यासंदर्भात लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी माझे बॉस अनिल अग्रवाल सरांच्या मनात अस्वस्थता आणि धाकधूक होती. त्यामुळे त्यांना विमानात फारशी झोपच लागली नाही,’ असं आस्था त्यागी यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणताही हस्तक्षेप नसून आमच्या टीमने सर्वेक्षण करुन हा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमधून सर्व सहकार्य मिळाले. प्रकल्पासाठी गुजरातमधून अनेक सवलती मिळाल्या यामुळेच या प्रकल्पासाठी गुजरातची निवड करण्यात आली. कोणताही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागेसह वीज आणि पाणी या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गुजरातमध्ये या सुविधांसह अनेक सवलती मिळाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातच्या धोलेरा इथं गेला आहे. हा वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. वेदांता व फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट प्रकल्प गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केली आहे. आता ज्या त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे प्रकल्प गेला. आता हे झाले ते होऊन गेले. पण महाराष्ट्राला आपण यापेक्षाही मोठा प्रकल्प निश्चित देऊ, महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे याची काळजी केंद्राला असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
Vedanta Industry Chairman Anil Agarwal on Foscon Project Gujrat