नाशिक – ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे पार पडलेल्या ” COP-26 ” या जागतिक हवामान बदल विषयावरील परिषदेसाठी नाशिकच्या वेदांत राहुल कुलकर्णी याने एक विशेष आमंत्रित म्हणून उपस्थिती नोंदवली. या परिषदेत सर्व देशांतील युवकांचे प्रतिनिधित्व ( Youth Leader ) त्याने केले आणि एक प्रमुख निरीक्षक ( Observer ) च्या भूमिकेतून तेथील ” वर्ल्ड लिडर्स समिट ” मध्ये सहभागी होण्याचा बहुमान त्याला मिळाला. त्यामुळे तेथे उपस्थित सर्व देशांतील पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष , पर्यावरण मंत्री यांच्याशी संवाद साधण्याची आणि संपूर्ण युवावर्गाच्या वतीने आपले विचार मांडण्याची संधी वेदांतला मिळाली.
हवामान बदल आणि त्याचा मानवी जनजीवनावर होणारा परिणाम हा वैश्विक स्तरावर आता एक अतिशय महत्वाचा ज्वलंत विषय आहे आणि त्यासाठी आजची युवापिढी सक्रियपणे आपले योगदान देत आहे, त्यावर वेदांत कळकळीने परिणामस्वरूप काम करीत आहे ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. वेदांतने आपला ११ वी १२ वी चा ऑनलाईन अभ्यास करताना ही संधी स्वतःच्या कौशल्यावर आणि स्वबळावर खेचून आणली आहे. यामागे त्याची बुद्धिमत्ता, निसर्ग,पर्यावरणाप्रतीची संवेदनशीलता आणि प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत आहेत.या आधी इटलीला झालेल्या परिषदेसाठी सुमारे १९० देशांतून आलेल्या डेलीगेट्सची निवड करण्याचे व त्यांना यथोचित मार्गदर्शन करण्याचे महत्वपूर्ण कार्यही वेदांतने यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.वेदात केवळ १७ वर्षांचाच असल्याने त्याच्या या यशावर चौफेर कैतुकाचा वर्षाव होत आहे. वेदांत १९ नोव्हेंबरला भारतात पोहचला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.