वटपौर्णिमेचे महत्त्व आणि पूजा
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.
सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व सनातन संस्थेच्या वतीने संकलित केलेल्या या लेखातून समजून घेऊया. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी असल्याने यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही आपत्कालात हे व्रत कसे साजरे करावे? हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत.
१. तिथी – वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात.
२. उद्देश – सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
३. सावित्रीचे महत्त्व – भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.
४. व्रताची देवता – वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
५. वटवृक्षाचे महत्त्व
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.










