वास्तू म्हणते तथास्तू
वास्तू तथास्तू म्हणते असे आपण जुन्या जाणकारांकडून अथवा घरातील जेष्ठ मंडळींकडून नेहमी ऐकतो. तथास्तु म्हणजे असंच होउ दे… वास्तुशास्त्र हे स्पंदने ,उर्जालहरी, कंपन यावर आधारित निसर्ग लहरींचे शास्त्र आहे.. याच निसर्ग लहरी, कंपन, स्पंदन आपल्या वास्तूमधून पण प्रवाहित होत असतात. शांत संयमित उर्जा लहरी, कंपने, स्पंदने आपल्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर सकारात्मक परिणाम (positivity) करतात. याउलट ज्यावेळी मोठे आवाज होतात, वाद होतो, भांडणे होतात. त्यावेळी वास्तुमधील शांतपणे प्रवाहित होत असलेल्या या निसर्ग उर्जा लहरी, स्पंदन, कंपन अति तीव्र होतात. म्हणजेच विपरीत होतात.
कोणतीही गोष्ट विपरित झाली किती आक्रीत घडवते. शांतता भंग करते. या सगळ्यांमुळे अस्ताव्यस्त विपरीत झालेल्या वास्तूतील निसर्ग कंपन, उर्जा लहरी, निसर्ग स्पंदना या संबंधितांच्या शारीरिक ,मानसिक त्याचप्रमाणे एकूणच विचारसरणीवर नकारात्मक (Negativity) परिणाम घडवू शकतात. वास्तू मधील वाद, ओरडणे, भांडणे त्याचप्रमाणे एकमेकांबद्दल वाटणारा मत्सर, असूया, नकारात्मकता यामुळे पाळीव प्राणी पक्षी एक्वेरियम मधील मासे देखील भेदरलेले जाणवतात. नेहमी वाद विवाद असणाऱ्या वास्तूच्या परिसरात पक्षीदेखील घरटी बनवत नाहीत, असे देखील निरीक्षण आहे.
घरातील सर्व सदस्यांनी जर एकमेकांच्या भावनांचा विचारांचा आदर केला एकमेकांच्या भावना दुखावणाऱ्या टोकदार शब्दांऐवजी सौम्य शब्दांचा वापर केल्यास समजुतीची भूमिका घेतल्यास घरातील निसर्ग ऊर्जा लहरी, कंपन, स्पंदन त्यांच्या मूळ लयीत आपल्या वास्तूतून शांतपणे प्रवाहित होत राहतील. आपल्या वास्तु लहरी शुभ अर्थाने आपल्याला तथास्तु म्हणण्यासाठी शांत व संयमित हसून खेळून तसेच मत्सर व असूयारहित राहण्याची सुरुवात आपल्यापासून व आजपासूनच करूया.