मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसंतदादा शेतकरी सहकारी बँक (अवसायनात) ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात. यामध्ये 1 लाख ते 5 लाख पर्यंतच्या ठेव रकमांची निश्चिती करुन तत्काळ परत करण्याचे प्रमाण निश्चित करावे, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.
मंत्रालयात सहकार मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे, आयुक्त सुनील पवार, अपर निबंधक शैलेश कोतमिरे, उपनिबंधक आनंद कटके, समित कदम उपस्थित होते.
सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या देणे रक्कमांबाबत बँकेच्या ताब्यातील व महानगरपालिकेस उपयुक्त ठरणाऱ्या मालमत्तेची विहित प्रक्रिया पूर्ण करुन खरेदी करण्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी प्रस्ताव तयार करावा. तसेच सहकार आयुक्त स्तरावर दरमहा बँकेच्या कर्जवसुली व ठेवी परत करण्याबाबत बैठक घेऊन कार्यवाही करावी आणि अवसायकांनी याबाबत कृती आराखडा तयार करून एकरकमी परतफेड योजनेस मान्यता देऊन कर्जवसुली करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.