नाशिक -साहित्याचे संस्कार श्रोत्यांवर पडतात,आणि त्यातून समाज घडत जातो,असे प्रतिपादन ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी केले.डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते,स्व. दगडू गेंदा खैरनार यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘आठवणी पुस्तकांच्या आणि लेखकांच्या’ या विषयावर खैरनार यांनी पंधरावे पुष्प गुंफले.
या व्याख्यानादरम्यान त्यांनी खांडेकर, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, रणजित देसाई,यांपासून ते अनेक लेखकांच्या साहित्यकृतींचा आढावा घेतला. कुसुमाग्रजांच्या पहिल्या विशाखा काव्यसंग्रहाला वि.स.खांडेकर यांची प्रस्तावना होती,यातील कवितांविषयी भरभरून बोलतांना खांडेकर यांनी ,’हा नवकवी महाराष्ट्राचा ख्यातनाम कवी होईल,’असे सूचित केले होते,अशी आठवण खैरनार यांनी सांगितली.
रणजित देसाईंचे ‘स्वामी’ त्यापाठोपाठ ‘राधेय’ यांच्या प्रकाशनपूर्व आठवणींना त्यांनी उजाळा दिला.राधेय कादंबरीला ययाती पेक्षा मोठे यश मिळो,असा आशीर्वाद खांडेकरांनी दिला होता.लेखकाच्या चांगुलपणातुन त्यांच्यातील लेखक मोठा होत जातो,असेही खैरनार म्हणाले.
लेखक,पुस्तके अनुभवतांना एक प्रेरणा मिळते,त्यातूनच ‘लेखक तुमच्या भेटीला’..हा उपक्रम सुरू झाल्याचे खैरनार नमूद करतात.
जयंत साळगावकर,कॅमलिनचे काकासाहेब दांडेकर, विठ्ठल कामत,विकोचे गजाननराव पेंढारकर यांच्या सहवासातून व्यवसायाची प्रेरणा मिळाल्याचे खैरनार यांनी स्पष्ट केले.याबरोबरच ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा सर्वाधिक खप झाल्याचे त्यांनी सांगितले, काळ बदलला, प्रगत तंत्रज्ञान आले,पण श्यामची आई या पुस्तकाची लोकप्रियता आजही टिकून आहे,असेही खैरनार यांनी सांगितले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.