नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथेली किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधीत्व केल्यानंतर काँग्रेसने वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले. त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरु करणा-या वसंतरावचे नावही घेतले जाते.
नाना पटोले यांच्याकडून श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
मंत्री छगन भुजबळांकडून श्रद्धांजली
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार, नांदेडचे विद्यमान खासदार, ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना! अशी श्रध्दांजली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्पण केली.