संजय देवधर
नाशिक – प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात आदिवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून दिसणार आहे. देशभरातील २५० आदिवासी चित्रकारांनी ते साकारले असून पालघर जिल्ह्यातील वीस वारली चित्रकारांचाही त्यामध्ये सहभाग आहे. राजपथावरील संचलनात अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमातून जगाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी संस्कृती पोहोचणार आहे आदिवासी संस्कृतीतील स्थित्यंतरे त्यातून उलगडतील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी संचलनात आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. ६ फूट रुंद व ४५ फूट लांबीच्या या चित्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीतील घटना आहेत. पाच चित्रांची ही मालिका असून त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी देशभरात आदिवासींवर होणारा छळ, अन्याय आणि त्याविरुद्ध अदिवासींनी दिलेला लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी संघटना तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समुहाने एकत्र राहून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे प्रसंग चित्रात साकारले आहेत. निसर्ग व गावदेवाचे पूजन करून स्वतंत्र भारतात आदिवासी बांधव गुण्यागोविंदाने जीवन जगत असल्याचे विविध घटना प्रसंगही आहेत. नवी दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या पुढाकाराने पंजाब येथील चितकारा विद्यापीठामध्ये २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील वीस कलाकार होते. डहाणूच्या गंजाड गावचे जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै. जिव्या सोमा मशे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या शिष्यांसह इतर सतरा जण या चित्रशैलीत सहभागी आहेत तर विक्रमगड तालुक्यातील तीन जणांचा सहभाग आहे.
वारली कलेचा सन्मान !
या उपक्रमात सहभागी होऊन आदिवासी संस्कृतीची अस्मिता जपण्याची संधी मिळाल्याने वारली कलाकार आनंदी झाले आहेत. आपल्या कलेद्वारे देशभक्ती व्यक्त करता आली याचे त्यांना समाधान वाटते. डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील अनिल चैत्या वांगड, राजेश चैत्या वांगड व त्यांचा मुलगा विशाल, पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे नातू विजय सदाशिव मशे, किशोर सदाशिव मशे, प्रवीण बाळू मशे तसेच अमित महादेव डोंबरे, देऊ रामा घोघडे, शांताराम राघ्या गोरखाना व त्यांचा मुलगा रुपेश, गणेश महादेव वांगड, बाळू लाडक्या दुमाडा, गणपत बाळू दुमाडा, नितीन शिडवा बालशी, सुनिता सिकंदर बरफ, सुनिता सुनील दळवी, वैष्णवी किरण भिंगल, चांदना चंद्रकांत रावते, मनोज भडांगे यांचा समावेश आहे. गावकरी देखील त्यामुळे खुश आहेत.