नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्याचे पडसाद आता नाशिकमध्येही उमटले आहेत. वारकरी संप्रदायाच्यावतीने अंधारे यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज नाशकातील वारकऱ्यांनी पायी दिंडी काढत आंदोलन केले.
वारकऱ्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत निषेध दिंडी काढली. जिल्ह्यातील कीर्तनकार आणि वारकरी या निषेध दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडी वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी आग्रही मागणी वारकऱ्यांनी यावेळी केली. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांची हकालपट्टी न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अंधारे ज्या पक्षात राहतील, त्यांना मतदान न करण्याचा निश्चिय यावेळी वारकऱ्यांनी केला. तशी घोषणाही यावेळी करण्यात आली.
Varkari Dindi on Sushma Andhare Controversial Statement
Nashik Politics