महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक – औषधे घेवून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडले. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जया रघूनाथ सातपुते (५६ रा.सुखदेव शाळे मागे,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जया सातपुते या शनिवारी (दि.२४)सायंकाळच्या सुमारास परिसरातील मेडिकल स्टोअर्स येथे औषधे खरेदी साठी गेल्या होत्या. औषधे घेवून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. एसबीआय कॉलनी समोरून त्या रस्त्याने पायी जात असतांना समोरून काळ्या दुचाकीवरून आालेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५१ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र असलेली सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.
—
ऑटोरिक्षा दुभाजकावर आदळली
नाशिक – भरधाव ऑटोरिक्षा दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहर फिरोज पठाण (रा.जहागिरदारवाडा,द्वारका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा प्रफुल्ल खडताळे (रा.रामदासस्वामी नगर,उपनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. खडताळे या दि.१८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एमएच १५ एफयू ६४११ या रिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. खडताळे या पवननगर येथे जाण्यासाठी शालिमार रिक्षा थांबा येथून अॅटोरिक्षात बसल्या होत्या. मायको सर्कल भागात चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव अॅटोरिक्षा दुभाजकावर आदळल्याने प्रवासी खडताळे यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
—
स्वारबाबानगरला एकाची आत्महत्या
नाशिक – स्वारबाबानगर भागात राहणाºया एका ४५ वर्षीय इसमाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाळू दगूजी गरूड (रा.धम्म चौक,स्वारबाबानगर) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. गरूड यांनी शनिवारी (दि.२४)आपल्या राहत्या घरी दरवाजा शोजारील खिडकीस बाहेरच्या बाजूने नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा विनोद गरूड यांनी खबर दिल्याने सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.