इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ७)
संत ज्ञानेश्वरांची समाधी शोधणारे
|| संत एकनाथ ||
एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. ”’हे देवा, तू आता हा गवताचा घास घे”, असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला.
संत निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी संत एकनाथ होवून गेले. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांच्या इतकेच महत्व संत एकनाथ यांना दिले जाते. एकनाथांचा जन्म देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते लहान असताना त्यांचे आईवडील देवाघरी गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे सुद्धा विठ्ठल भक्त होते.
एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.
एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे.
’एकनाथी भागवत’
’एकनाथी भागवत’ ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) आहे.
भावार्थ रामायण व रुक्मिणीस्वयंवर
नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर हे ही काव्य त्यांनींच लिहीले आहे.
‘त्रिगुणात्मक त्रयमूर्ति ही दत्ताची आरती
नाथांची दत्ताची आरतीही ‘त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण’ त्यांनींच लिहीली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक रचना अभंग गवळणी असे स्फुट लेखन एकनाथ यांनी केले.’संत एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे.
एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.
नाथांचा भक्तांना उपदेश
नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.
एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.
एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला.
एकनाथ महाराजांचे महान कार्य
संत ज्ञानेश्वरांचे समाधिस्थळाचा शोध आणि ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण
संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध आणि ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
संत एकनाथ महाराजांचे लेखन
१) एकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका २) चतु:श्लोकी भागवत३) एकनाथी अभंग गाथा ४) संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ – एकूण २५ अभंग ५) हस्तमालक टीका ६) शुकाष्टक टीका ७) स्वात्मबोध ८) चिरंजीवपद ९) आनंदलहरी १०) अनुभवानंद ११) मुद्राविलास १२) लघुगीता १३) समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना. १४) रुक्मिणीस्वयंवर १५) भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
एकनाथ महाराजांचे सामर्थ्य –
एकदा एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले.
एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ”आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.” ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले.
एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. ”’हे देवा, तू आता हा गवताचा घास घे”, असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ”देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.” तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य ष्ष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
(क्रमश:)
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७