गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वारी पंढरीची (भाग ३) तुका आकाशाएवढा! अशी आहे संत तुकाराम महाजारांची महती

by Gautam Sancheti
जून 17, 2023 | 7:33 pm
in इतर
0
sant tukaram maharaj e1687010482590

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ३)
तुका आकाशाएवढा !

               वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

                जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.

               तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.     

               तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

               भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग   रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत  पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत.

               संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला.
                इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे.

                खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले.
               संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे.

जीवन चरित्र
               तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य  वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहांता पासून आहे.
तुकारामांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता.  मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.

               तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.

               तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.   सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग  कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
              देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
               पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.               फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.

               तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय.        जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

               समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.

               संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे   यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.

               देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते.

               संत तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव “हरिनामात” गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी “तुकाराम बीज” हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात “श्री हरि भगवान विष्णू” यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच “राम” आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते.

जीवनोत्तर प्रभाव
               संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला  स्वप्नात गुरुपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके
               संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची   संस्कृतिक  विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये   रुळणाऱ्या,  कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत.

               ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.

               संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला. नंतर ते विरोधक नमले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे.

               संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.

तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार – कर्णे गजेंद्र भारती महाराज)
तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
श्री संत तुकाराम महाराजांची गाथा (संपादक ह. भ. प. श्री. पांडुरंग अनाजी घुल

संत तुकाराम महाराजांवरील चित्रपट
प्रभातचा ‘संत तुकाराम’
               इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत ‘संत तुकाराम’ या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. हा मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट निघाले.

कोहिनूर, शारदा आणि मास्टर ॲन्ड कंपनी चे संत तुकाराम
               १९३६ सालचा मराठी चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला ‘संत तुकाराम’. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता ‘शारदा फिल्म कंपनी’ने आणि दुसरा ‘मास्टर ॲन्ड कंपनी’ने ‘संत तुकाराम’ अर्थात ‘जय विठ्ठल’ या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही.

कानडी, हिंदी, मराठी आणि तामिळ भाषेतील संत तुकाराम
१९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक – सुंदराराव नाडकर्णी
तुका झालासे कळस (मराठी चित्रपट, १९६४) – दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
१९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते ‘संत तुकाराम’. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा ‘आवडी’ बनल्या होत्या.
इ.स.१९७४ मध्ये ‘महाभक्त तुकाराम’ आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा ‘श्री जगत्गुरू तुकाराम’.
इ.स. २०१२सालचा ‘तुकाराम’ हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता.
तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू झाली. ती ११ ऑगस्ट २०१८ रोजी समाप्त झाली.

( क्रमश: )
-लेखक:- विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७ 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार; साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव सह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार

Next Post

राज्यात पाऊस केव्हा पडणार? शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
monsoon clouds rain e1654856310975

राज्यात पाऊस केव्हा पडणार? शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011