बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वारी पंढरीची (भाग ८ ) वैकुंठीची वाट पंढरी जाणा || संत सोपानदेव ||

by Gautam Sancheti
जून 23, 2023 | 11:53 am
in इतर
0
sant sopandev

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ८ )
वैकुंठीची वाट पंढरी जाणा
|| संत सोपानदेव ||

               संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण. ही भावंडे सतत एकमेकांसोबत राहिली, वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाहीत. जणू ही चार मानवी शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच असावा, एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते. सोपानदेवांचे चरित्र अभ्यासताना ही बाब विशेषत्वाने लक्षात घ्यावी लागते.

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

जीवनकथा
विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे लहान होती. सोपानदेवांचे वय तर अजाणतेच म्हणावे लागेल. अगदी संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ अर्थात ‘भावार्थदीपिका लिहिली तेव्हा म्हणजे शके १२१२ (इ.स. १२९०) मध्ये त्यांचे वय अवघे पंधरा- सोळा वर्षांचे होते. सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथापे्षा सहा वर्षांनी, संत ज्ञानदेवांपेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते, तर संत मुक्ताबाई पेक्षा तीन वर्षांनी मोठे होते.

बालपण
संत जनाबाईंच्या अभंगास प्रमाण मानल्यास सोपानदेवांचा जन्मशक ११९६ (इ.स. १२७४) गृहित धरावा लागतो. त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछायेखाली गेले असले तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्पकाळ मिळाले होते. त्यांनतरचे त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेलेले आहे. सोपानदेवांना आपल्या आई वडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच, शिवाय त्यानंतर थोरल्या भावंडांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहे. आई वडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणी केली. त्यावेळी निवृत्तीनाथांच्या ब्रह्मगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला असावा.
पुढे भावंडासोबत शुद्धिपत्र मिळविण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता. नंतर भावंडासोबत पंढरपुरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थटनही त्यांनी केले. अशाप्रकारे त्यांना बालपणातच एकप्रकारची भटकंती करून जीवन कंठावे लागले होते.

शिष्य परिवार
सोपानदेव वयाने लहान असले तरी अध्यात्मातील अधिकारी पुरूष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे साहजिक होते. काही संतजनानी त्यांचे शिष्यत्व पत्करल्यांची नोंद विविध अभंगांतून मिळते.
वारकरी सांप्रदायामध्ये विसोबांना कुठे ज्ञानदेवांचे तर कुठे मुक्ताबाईंचे शिष्य मानलेले आहे. मात्र स्वतः विसोबा खेचर यांचा खालील अभंग प्रमाण मानल्यास त्यात ते स्वतःचा उल्लेख  सोपानदेवांचा शिष्य असाच करतात. सोपानदेवांना ते सद्गुरू म्हणून त्यांनी आपल्या माध्यावर कृपेचा हात  टेवल्याची नोंद करतात.

               माझी मुळ पीटिका सोपान सद्गुरू । तेणे माथा कर ठेवियेला ।।१।।
त्याचे कृपेकरून मीपणा ठकलो । देहेभावा गेलो विसनिया ॥२॥
चांगयावा अगिकार मुक्ताईने केला । सोपान वोळला मजवरी ॥३॥
जन्ममरणाचे भय नाही आता । खेचरी तत्त्वता मुद्रा दिली ॥४॥
जिकडे पाहे तिकडे आनंद भरला । खेवर सामावला तयामाजी॥५॥”
त्यांच्या अभंगरचनेचा दाखला देत प्र.न.जोशी लिहितात, “पैठणजवळच्या ‘मुंगी’ या  गावचे राहणारे हे विसोबा खेचर. ज्ञानेश्वर-नामदेवांच्या उत्तरेतील यात्रेत इतर संतांबरोबर हे होते. औंढ्या नागनाथ या पुरातन अशा शिवक्षेत्री यांचे वास्तव्य नेहमी असे. यांनी सौपानदेवांना आपले गुरू मानले होते. काही संशोधक विसोबांना ज्ञानेश्वरांचे शिष्य मानतात. विशेष म्हणजे ज्या ग्रंथात प्र.न.जोशी यांनी वरील लेख लिहिला आहे त्याच ग्रंथात त्याचे संपादक ल.रा.पांगारकर विसोबा खेचर हे ज्ञानेश्वरांचे शिष्य व त्यांचे शिष्य नामदेव.” असा उल्लेख करतात. यामुळे स्वतः विसोबांचाच अभंग प्रमाण मानावा आणि विसोबा खेचर हे सोपानदेवांचेच शिष्य होते, हेच मत योग्य वाटते.

अवतार समाप्ती
ज्ञानेश्वरादी भावंडे निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात सतत एकमेकांसोबत राहिली. आलेली सारी संकटे त्यांनी एकत्रितपणे झेलली. सर्वच प्रसंगांना सारी मिळून सामोरी गेली. पैठणचा प्रवास असो,की पंढरीची वारी असो. तीर्थाटन असो की, माधुकरी मागणे असो. सर्वत्र ही चारही भावंडे एकमेकां  सोबत सावली  सारखी वावरली. मात्र ज्ञानदेवांच्या प्रयाणानंतर ही घडी विस्कटली. त्यांच्या जीवनातील आनंदच हरपल्यासारखा झाला. आपणही आता समाधी घेऊन या जगाचा निरोप घ्यावा, अशी भावना सर्वांच्याच मनात येत असावी. ती सर्वप्रथम बोलून दाखविली सोपानदेवांनी. ज्ञानदेवांनतर आधार गेल्यामुळे म्हणा किंवा विरक्ती वाढल्यामुळे म्हणा, पण सोपानदेवांना समाधी घेण्याची घाई झाली असावी. त्यातूनच ज्ञानदेवांच्या समाधी सोहळयानंतर अवध्या एका महिन्यातच सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य १३ रोजी सासवड येथे समाधी घेतली.

वाङ्मयीन कार्य
निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांसारख्या प्रज्ञावंत भावंडांच्या सहवासात सतत राहिल्यामुळे, मुळात करूणावतार असलेल्या सोपानदेवांना लेखनाची उर्मी असणे नैसर्गिकच होते. नेवासे येथे ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी चे निरूपण केले, ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ लिहिला. पुढे चांगदेवाच्या पत्राच्या निमित्ताने ‘चांगदेवपासष्टी’ हा ग्रंथ सिद्ध झाला. निवृत्तीनाथ व मुक्ताई यांनीही अमंगरचना केली. यांच्या सहवासामुळे सोपानदेवांनीही लेखन केले आहे. त्यांच्या नावावर ‘सोपानदेवी’ हा ग्रंथही असल्याचे काही संशोधक मानतात. मात्र तो उपलब्ध नाही. तथापि, त्यांनी लिहिलेले अभंग उपलब्ध आहेत.

अभंगरचना
संत सोपानदेवांनी केलेल्या अभंगरचनेकडे संख्यात्मक दृष्टीने पाहिल्यास ती अतिशय कमी आहे. मात्र त्याकडे भावात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील मूल्ये लक्षात येतात. सोपानदेवांच्या अभंगाचे मर्म नेमकेपणाने सांगताना प्रा. कृष्णा गुरब लिहितात, “संत श्रीसोपानदेव महाराजांच्या अभंग अक्षय ज्ञानगंगेत प्रवेथ करताच आपल्या मेंदूवरील  जन्माजन्मांच्या क्षुद्रातिक्षुद्र विचारांचे चिकट चिकट, अतीअती चिकट, थरच्या थर अगदी सहजरीत्या विरघळून निघून जातात.

               कमालीचे अंतर्मुख करणारे जीवनविचार सांगून बुद्धीची मलीनताच दूर करण्याचे पहिले कार्य श्रीसोपानदेव करतात.”वस्तुतः कोणत्याही वारकरी संताने निर्मिलेले अभंग ठरवून एखाद्या साच्यात बसवलेले नाहीत. ती काही त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली उठाठेव नाही. त्यामागे निखळ भक्तिभाव आहे. त्या त्यांच्या मनातील भक्तीच्या भावना आहेत. त्यामुळे या अभंगांची स्पष्ट वर्गवारी करता येत नाही. मात्र ज्या विषयाचे प्रतिपादन त्या अभंगात केंद्रस्थानी आढळते, त्यामध्ये त्याचे बर्गीकरण करावे लागते.

पंढरी माहात्म्य व नामपर
संत सोपानदेवांनी निर्मिलेल्या अभंगातील जवळपास निम्मे अभंग पंढरीचा महिमा वर्णन करणारे व पांडुरंगाच्या नामस्मरणाचे माहात्म्य सांगणारे आहेत. वारकरी संतांना पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. याठिकाणी आले, पंढरीची वारी केली की, स्वर्गाची प्राप्ती होते ही या संतांची आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या अनुयायांची श्रद्धा आहे. पांडुरंगाच्या पायाचे दर्शन व नामस्मरण जीवाला मुक्ती मिळवून देण्यास पुरेसे आहे ही त्यांची श्रद्धा असते. सोपानदेवांनीही या

श्रद्धायुक्त अंतःकरणानेच या रचना केलेल्या आहेत.
उघडली दृष्टी इंद्रिया सकट । वैकुंठीची वाट पंढरी जाणा ॥१॥
दृष्टीभरी पाहे दैवत । पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड | विषयाचे जाड टाकी परते ॥३॥
सोपान म्हणे गुफसी सर्वथा। मग नव्हे उत्तथा भक्तिपंथे ॥४॥”

               आपली दृष्टी उघडली असून म्हणजे आपणास नवे भान आले असून पंढरीला जाणे म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रशस्त करणे होय. तेथे गेल्यावर आपले आराध्य विठ्ठलाचे दर्शन झाले म्हणजे माझे मनोरथ पूर्ण झाल्यासारखे आहे. यासाठी सोपानदेव सर्वसामान्य जनांस विनंतीपूर्वक   सांगतातकी हाच सोपा मार्ग आहे वैकुंठाच्या प्राप्तीसाठी. यासाठी सर्वांनी पंढरीची वारी केली पाहिजे.

               सकल वैष्णव भक्तांना सोपानदेव पंढरपुराला येण्याचे आवाहन करतात व आपण सारे विठ्ठलापाशी प्रेमामृत मागू असे सांगतात. सारे गोपाळ एकत्र आल्यावर प्रत्यक्ष स्वर्गातील देवांना वाकुल्या दाखवीत आणि टाळी वाजवीत आहेत. टाळ, मृदुंगाच्या गजरात या विठ्ठलभक्तांच्या दिंड्या चालल्या आहेत. अशा भक्तांचा हरीनामाचा गजर कानी पडल्यावर शंखचक्रांकित विठ्ठलच या भक्तांच्या भेटीसाठी सामोरा आला आहे. सोपानदेव म्हणतात, या दर्शनाने आनंदलेल्या भवतांनी मग पंढरीच्या वाळवंटात काला केला.

               पंढरपूर या नगरीचे माहात्म्य आणि आपले आराध्य दैवत पांडुरंग यांचा गौरव सोपानदेवांनी केलेला आहे. पंढरीची तुलना ते वैकुंठाशी करतात. ते पंढरीला भूवैकुंठच मानतात. पांडुरंग हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. तोच पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीला आला आहे. यामुळेच त्याला सोपानदेव ‘गोविंद’, गोपाळ’, ‘श्रीहरी’, ‘अच्युत’, ‘माधव’ अशा अनेक नावाने पुकारतात. पंढरीची वारी आणि पांडुरंगाचे नित्य स्मरण करणाऱ्यास अन्य देवाची भक्ती करण्याची, अन्य तीर्थाची यात्रा करण्याची गरजच नाही. केवळ एवढ्याच गोष्टीमुळे त्याला वैकुंठप्राप्ती होते, त्याचा जन्ममरणाचा फेरा थांबतो, अनेक योनीतून करण्याचा प्रवास थांबतो. पंढरीची वारी व पांडुरंगाचे नित्य स्मरण, ‘रामकृष्ण हरी’ या नामाचा जप करणे, यामुळे प्रपंचातून मुक्ती मिळेल, असा सोपानदेवांचा दृढ विश्वास आहे.

श्रीनिवृत्तीनाथ कृपा
श्रीनिवृत्तीनाथ हे या सकल भावंडांचे गुरू. ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या सर्वांनाच त्यांनी गुरूदिक्षा दिली. त्यामुळे या सर्वांनाच निवृतलीनाथांबदल खूप आदर आहे. या सर्वांनी निवृत्तीनाथांची आपल्यावर असलेली कृपादृष्टी व प्रेम व्यक्त करण्यासाठी अभंगरचना केली आहे. सोपानदेवाचेही असे काही अभंग आहेत.

               हरिविण नाही वेदांदिका मती । श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥
हरी हाची सर्व उपनिषद भाव । रोहिणीची माव जनी दिसे ।।२।।
सर्वघटी राम जीवशिव सम । सर्वरूपे ब्रह्म भरले सदा ॥३॥
सोपान निकट परब्रह्म सेवी । सर्व हा गोसावी विड्ठलराज ।।४।।
               श्रीहरिशिवाय वेदांनाही काही अर्थ उरत नाही. हीच श्रृतींची संपत्ती आहे. तोच उपनिषदांचेही भावरूप आहे. श्रीराम सर्वाघटी व्यापलेला आहे. सर्वत्र ब्रह्मच भरलेले आहे. सोपानदेवांनी या परब्रह्मस्वरूपाची अनुभूती घेतली असून त्यांना सर्वत्र श्री विठ्ठल भरलेला दिसतो आहे. सोपानदेव व त्यांचे अभंग यावर भाष्य करताना प्रा. कृष्णा गुरव लिहितात,               “वेदप्रणीत महाविचारांचे सार म्हणजे श्रीसोपानदेव. वेदांतील समृद्ध पारमार्थिक   महाविचारांतूनही परमकैवल्यधाम दर्शविणारे सारभूत विचार श्रीसोपानदेव स्वतः जगले आणि मानवाने केलेली सर्व प्रकारची अवहेलना संतोषपूर्वक सहन करूनही या मानवाच्याच परमउद्धारार्थ सोपानदेवांनी हे ‘महाविचारांचे सार’ आपल्या अभंगांच्या रुपाने जगासमोर ठेवले. ही सोपानदेवांची परमकरूणेची परमसीमा होय.

समारोप
निवृत्ती, ज्ञानदेव या थोरल्या भावंडांच्या व मुक्ताई या धाकट्या बहिणीच्या सदैव सहवासात राहिलेल्या सोपानदेवांनी समाजाची अनेक रूपे पाहिली होती. त्यांचा छळ करणारा   उच्चवर्ग व अज्ञानी व दरिद्री असूनही त्यांच्यावर प्रेम करणारा बहुजन वर्ग, या दोहोंचीही प्रचिती त्यांना आली होती. हा अडाणी समाज भगवंताच्या चरणी लागावा व त्याचा उद्धार व्हावा ही त्यांची भावना तयार होणे साहजिक होते. या सर्वच भावंडांच्या मनात सामान्य जनाविषयी करूणा होती. तशीच ती सोपानदेवांजवळ होती. श्रीहरी हा सदासर्वकाळ असणारा व नित्य आहे, तोच जगाचा चालक व पालक आहे. तो सर्वत्र नांदत असतो. हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपुरी पांडुरंगाच्या रुपाने भक्तांच्या कल्याणासाठी उभा ठाकला असून त्याच्या पायावर माथा ठेवून सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे. तोच या भवसागरातून तरून जाण्यासाठी मार्ग दाखवील, असा त्यांच्या अभंगातून उपदेश पहावयास मिळतो. यामुळेच सोपानदेवांच्या अभंगात या सामान्य जनतेच्या हितासाठी भगवंताचा धावा केलेला दिसतो.

               मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे, यातच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असा त्यांच्या अभंगाचा मतितार्थ आहे.
               या भावंडांतील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य १३, शके १२१८ या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर, सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली. यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सोपान  देवांनीही त्यानंतर केवळ एका महिन्यात शके १२१८ मध्येच मार्गशीर्ष वद्य १३ रोजी सासवड गावी कर्हेच्या तीरावर वटेश्वराच्या राऊळाजवळ समाधी घेतली व आपली जीवनयात्रा संपविली.

संत सोपान मंदिर सासवड  – मुख्य मंदिर
संत सोपान मंदिर सासवड हे संत सोपानकाकांचे समाधिस्थान. सासवड हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात, पुणे बारामती रस्त्यावर पुण्यापासून ३० किमी अंतरावर आहे. येथे संत सोपानकाकांची समाधी व वटेश्वर, संगमेश्वर वगैरे प्राचीन शिवमंदिरे आहेत. याशिवाय पहिले पेशवे – बाळाजी विश्वनाथ यांचे समाधीस्थान सुद्धा येथे आहे. याशिवाय जवळच जेजुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
संत सोपानकाका समाधी मंदिर सासवड शहराच्या दक्षिणेस चांबळी नदीच्या तीरावर आहे. संत सोपानकाकांनी सासवड येथे नागेश्वर मंदिराच्या आवारात समाधी घेतली. त्यानंतर नागेश्वर मंदिराच्या मागील बाजूस संत सोपानकाकांचे समाधी मंदिर बांधण्यात आले.

संत सोपान मंदिर सासवड  – नित्य कार्यक्रम
काकडा आरती व पूजा – सकाळी ५.३० वाजता काकडा आरती होते . त्यानंतर पंचामृत पूजा , नैवेद्य व आरती होते . यावेळेस मंडपात भजन सुरु असते .
नैवेद्य – दुपारी नैवेद्य होतो . उपवासाच्या दिवशी फराळाचा नैवेद्य असतो .
पोशाख – सायं. ४ वाजता समाधीस पोशाख होतो.
प्रवचन – सभा मंडपात रोज ४ वाजता प्रवचन होते .
हरिपाठ व शेजारती – रात्री मंडपात श्री सोपानदेव व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे भजन होते. त्यानंतर शेजारती होऊन मंदिर बंद होते .

यात्रा व उत्सव
समाधी सोहळा – संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली . यानिमित्ताने मार्गशीर्ष वद्यात सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो .
पालखी सोहळा – जेष्ठ व. १२ ला सोपानदेवांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवते . आदल्या दिवशी जेष्ठ व. एकादशीला ज्ञानेश्वरांची पालखी सासवड ला मुक्कामाला येते . त्यामुळे दर्शनाला गर्दी होऊन मंदिर व परिसराला यात्रेचे स्वरूप येते . आषाढ व. ६ ला सोपानदेवांची पालखी सासवड ला परत येते . याच दिवशी ज्ञानेश्वरांची पालखी सुध्दा सासवडला सोपानदेवांच्या मंदिरात मुक्कामास येते

( क्रमश:)
-विजय गोळेसर मोबा, ९४२२७६५२२७

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे जिल्ह्यात वाळू डेपो कधी सुरू होणार? महसूलमंत्री म्हणाले…

Next Post

शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा! जगभरात चिंता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
shane warn e1687501890236

शेन वॉर्नच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा! जगभरात चिंता

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011