इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग ११)
आयुष्यात कधीही पंढरपुरला न गेलेले
|| संत सावतामाळी ||
महाराष्ट्राच्या मातीत अनेक संतांनी जन्म घेतला. त्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत सखुबाई, संत गोरा कुंभार, संत सेना, संत जनाबाई यातीलच एक संत म्हणजे संत सावता माळी आहेत. संत सावता माळी हे एक संत कवी आहेत. ते संत नामदेव, ज्ञानदेव यांचे समकालीन असून पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे ते रहिवाशी होते. आपल्या दिवसभराच्या कामात देव असतो व आपल्या भाजीपाल्यामध्ये देव शोधणारा संत सावता माळी आहेत.
संत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे रहिवासी. त्यांच्या वडिलांचे नाव परसूबा आणि आईचे नाव नांगीताबाई होते. अरणभेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे अभंगाद्वारे व भक्ती द्वारे महिमा गात असत. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावाचा मळा ते फुलवीत असतात.
आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. त्याचबरोबर ते ईश्वरभक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वरभक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे.
“न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची” असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. काशीबा गुरव नावाची व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्ये ही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसे.
आमची माळीयाची जात | शेत लावू बागाईत |
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||
या अभंगांमध्ये संत सावतामाळी म्हणतात की, आमची जात माळी आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी, लसूण कोथिंबीर आणि मिरची अशी बागायत शेतीमध्ये पीक घेत असतो आणि त्या मध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरांमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या कामांमध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं आहे. अध्यात्म भक्ती आणि आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्म चरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दांभिकता यावर त्यांनी सतत कोरडे ओढले संत सावता महाराज हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत होते. त्यांच्या काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. सावता हा भाववाचक शब्द आहे. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले होते.
आपल्या जन्मस्थळाबद्दल सावता माळी म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी
संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या माढा तालुक्यात अरण या गावात मध्ये झाला. अरण येथेच त्यांनी आपल्या मळ्यातच विठ्ठलाचे नामस्मरण करत समाधी घेतली. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना वारकरी आवर्जून अरण येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला. त्यांच्या अभंगांत वात्सल्य, करुणा, शांती, भक्ती हे रस आढळून येतात. संत सावता माळी यांनी सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव महत्वाचा आहे. त्यांनी आपल्याला कामातच देव आहे, देवाला भेटण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कारण देव सर्वत्र आहे. असा संदेश दिला. संत सावता माळी यांनी शेती करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत. गाडगेबाबा ज्याप्रमाणे देव दगडात नसून माणसात आहे. माणसांची सेवा करावी असं सांगत त्याचप्रमाणे सावता महाराज म्हणत की प्रत्येकाने आपल्या कामातच देव शोधावा. त्याला विशिष्ट ठिकाणी शोधण्याची गरजच नाही कारण तो सर्वत्र आहे. म्हणून सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.
पांडुरंगाला हृदयामध्ये लपून ठेवले
संत सावता माळी यांच्या विषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, पैठणच्या कूर्मदास या भक्ताला भेटण्यासाठी विठ्ठल निघाले असताना वाटेत ते सावता महाराजांचा मळ्यात थांबले. पंढरीनाथाबरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव हेही होते. भक्तीची पराकाष्ठा हे त्या दोघांना दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, सावता माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला लपायला जागा दे. त्यावर सावता महाराज म्हणाले, “देवा, या जगात अशी कोणतीच जागा नाही तेथे तू दिसू शकणार नाही.” विठ्ठल म्हणाले, “तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता महाराजांनी खुरप्याने आपले पोट फाडून देवाला स्वतःचा उदरात लपवले. इकडे देवाचा शोध घेत संत ज्ञानदेव आणि नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देवाला कुठे पहिले आहे का ?” सावता महाराज काहीच बोलले नाहीत. नामदेव आणि ज्ञानदेवांची व्याकुळता बघून विठ्ठलाने सावता महाराजांना त्यांचा उदाराचा बाहेर काढायला सांगितले. देव बाहेर आल्यानंतर नामदेवाला आणि ज्ञानदेवांना झालेल्या आपल्या भक्तीचे गर्वहरण देवाने यावेळी केले.
पंढरपुर पासून अरण हे गाव जवळच आहे परंतु सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील लोकांची ते अरण येथे सेवा करत. यावरून पुन्हा त्यांचा कर्म भक्तीचा उजाळा होतो.
संत सावता महाराजांनी शेवट पर्यंत आपल्या मळ्यातच कर्म करत विठ्ठलाचा भक्तीची उपासना केली. आपल्या मळ्यामध्येच विठ्ठलाचे नामस्मरण करत समाधी घेतली. त्यांनी दिलेला संदेश आजही समाजाला भक्ती आणि कर्म यांची उचित दिशा दर्शवतात. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचे रूप पाहत असत. त्यांच्या सासरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावतामाळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला जो उपदेश केला तो असा की,
प्रपंच असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |
उंच नीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणीच ||
घटका आणि परत साधी उतावीळ | वाउगा तो काळ जाऊ नेदी ||
सावता म्हणे कांती जपे नामावळी | हृदय कमळी पांडुरंग ||
आपल्या कामातच देव पाहणारे काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकार वाणीने परमार्थाचा उपदेश करणारे, सावतामाळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते.
सावता महाराज यांची समाधी
त्यांच्या अभंगात त्यांनी म्हटले आहे.
सावता म्हणे ऐसा मार्ग धरा | जेणे मुक्तीद्वार ओळंगती ||
संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून स्विकारले त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे.
सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नव्हते
आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले.
आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते. सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून मंदीराजवळ विहीर आहे.
संत सावता महाराज यांचे राहते घर
संत सावता महाराज यांचे घराचे जुने अवशेष शिल्लक नसून त्या ठिकाणी नवीन पद्धतीने घर बांधले आहे. अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. सावता महाराज पंढरपूरला कधीही गेलेली नाही असे म्हणतात. सावता महाराजांना भेटण्यासाठी देव पांडुरंग स्वतः येथे आले. आजही ही परंपरा पाळली जाते. आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस असतो कालची दिवशी पंढरपूर वरून निघालेली देवाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.
(क्रमश:)
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७