इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग – १३)
दुर्गे दुर्घट भारी ही देवीची आरती लिहिणारे
संत नरहरी सोनार
मूळचे शिव भक्त असलेले नंतर पांडुरंग भक्त झालेल्या नरहरी सोनार यांनीच देवीची सुप्रसिद्ध दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ही आरती लिहिली आहे. कट्टर शिवभक्त असलेले नरहरी विठ्ठल भक्त कसे झाले आणि त्यांनी दुर्गेची आरती कशी लिहिली हे जाणून घेणं मनोरंजक आहे.
संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील एक संत होते. सुरुवातीला ते केवळ शिवशंकराची आराधना करीत असत. रोज सकाळी उठल्यावर पूजा व ज्योतिर्लिंगावर बेलपत्रे वाहत असत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची मुळीच श्रद्धा नव्हती. जरी ते पंढरपुरात राहत होते आणि त्यांचे घर विठ्ठल मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही त्यांनी एकदाही विठ्ठलाच्या मंदिराला भेट दिली नाही कारण त्यांना विठ्ठलाशी किंवा त्यांच्या भक्तांशी काहीही देणेघेणे नव्हते. विठ्ठलाच्या मंदिरातील उत्सवाच्या काळात नरहरी पंढरपूरपासून दूर शेजारच्या गावात जात असे कारण उत्सवात त्यांना रस नव्हता आणि भक्तांच्या गर्दीचा त्यांना त्रास होत असे. त्यांचा हा विलक्षण गुण गावातील प्रत्येकाला माहीत होता.
संत नरहरी सोनार हे जातीने सोनार होते. चौदाशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी महाराज यांना आशीर्वाद दिला होता की, हा मुलगा हरी हराचा समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल व तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल.
लहानपणापासून नरहरी यांच्यावर घरात असलेल्या शिवभक्तीचे संस्कार होऊ लागले होते. त्यांना कुशाग्र बुद्धी असल्यामुळे बालपणीच त्यांना अनेक शिव स्तोत्रे पाठ होती. रोज शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराची पूजा पाठ करण्यात त्यांना आनंद वाटत होता आणि तेही मनोभावाने शिवभक्ती करू लागले व लहान वयातच ते थोर शिवभक्त झाले.
संत नरहरी महाराजांच्या वयाच्या सतराव्या वर्षी नरहरी महाराजांचा उपनयन संस्कार संपन्न झाला. वयाच्या अठरा ते वीस वर्षा दरम्यान नरहरी सोनार यांचा विवाह गंगा नावाच्या संस्कारी मुलीशी झाला. ती ही ईश्वरभक्त होती. ते वडिलोपार्जित सोन्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचे आडनाव सोनार असे झाले.
नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज हे नरहरींना गुरू म्हणून लाभले. त्यांच्याकडून नरहरी महाराजांचा उपदेश व नाथ संप्रदायाची दीक्षा गायत्री मंत्र प्राप्त झाला. नरहरी मोठे होऊ लागले तसतसे त्यांनी शिवभक्ती वर आधारलेले सर्व ग्रंथ वाचून काढले. तेव्हा पासून शिव-पार्वतीचे महत्त्व त्यांच्या नजरेत वाढू लागले. त्यांची शंकरावर निस्सीम श्रद्धा होती. त्यांनी आपला ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता त्यांचे अंतकरण म्हणजे जणू शिवमंदिर होते. तेथे शिवपार्वती विराजमान आहेत असं ते मानत. आणि ते इतर देवतांचे दर्शन तर दूरच ते इतर देवांचे नावही घेत नसत.
अशा या कट्टर शिवभक्ताच्या जीवनात एके दिवशी एक चमत्कार घडला. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनविण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगलाच जम बसवला होता.
एकदा एका विठ्ठल भक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वितभर जास्त होत होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला ही साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. पण माप बरोबर असूनही असे कसे होत आहे. या विचारात ते पडले .
शेवटी नरहरी सोनार स्वतः विठ्ठल मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्ती समोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्रचर्म लागले. त्यांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनार यांनी लगेच आपल्या डोळ्यावर पट्टी काढली बघतात तर काय? समोर विठ्ठलाची मूर्ती होती.
पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच . यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की, पांडुरंगच भगवान शिव शंकर आहेत. शिव आणि विष्णु भिन्न नाही एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलाच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, “देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार”
नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार हे होते असे म्हटले जाते. पंढरपूर येथे त्यांचे वंशज श्री प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे. नरहरी महाराजांच्या पादुका आणि देवपूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांचेकडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते.
विशेष म्हणजे मूळचे शिव भक्त असलेले नंतर पांडुरंग भक्त झालेल्या नरहरी सोनार यांनीच आपण सगळेच नवरात्रांत घरोघरी म्हणतो ती ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी. ..’ ही देवीची सुप्रसिद्ध आरती लिहिली आहे.
समाधी
संत नरहरी सोनार यांनी 2 फेब्रुवारी 1314 साली देवाचे नामस्मरण करता करता समाधिस्थ झाले व आपली प्राणज्योत विठ्ठलामध्ये एकरूप केली. तो दिवस होता माघ वद्य तृतीया सोमवार. अशाप्रकारे संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा महिमा अजरामर केलेला आहे.
(क्रमश:)
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७