इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग १२)
निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
संत गोरा कुंभार
संत गोरा कुंभार (इ.स. १२६७ – २० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.
“तेर” नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर” येथील “काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे “तेर’ गावात माधव बुवांना “संत” म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे.
याबाबत असे म्हणता येईल की, माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरून एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोरोबांचा जन्म झाला आहे.
गोरोबा पेशाने कुंभार होते. संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते,संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ,मुक्ताबाई,सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडीलधारी होते. त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत.
संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संताची, ‘कोणाचे मडके(डोके)किती पक्के’अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली.तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता,त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले.तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.
संत गोरा कुंभार यांचा विवाह संतीशी झाला.त्यांना एक गोंडस बाळ झालं. नंतर त्यांनी रामी यांच्याशी लग्न केले.
संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत,भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात.त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता,श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना,लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडविण्यासाठी चिखलात रांगणारे लहानगे बाळ जवळ आले आणि मातीत त्यांच्याच पायाखाली गाडले गेल्याचे समजले नाही.त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यत लहानगे बाळ गतप्राण झाले होते.तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करु लागले.नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मुल जिवंत झाले.(अशी अख्यायिका सांगितली जाते.)
संत गोरोबांनी शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली. संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे. या समाधी जवळ एक मंदिर आहे.
संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे.त्यांचे सुमारे 20 अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत.त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे.
संत गोरोबांचे अभंग-
संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा,सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत.निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥
मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥४॥
-संत गोरा कुंभार-
गोराकुंभार यांची चरित्रे व जीवनकार्यावरील ग्रंथ
संत गोरा कुंभार (लेखक – अशोकजी परांजपे)
श्री विठ्ठलाच्या संत मेळाव्यात श्रीसंत गोरा कुंभार (लेखक – धोंडीराम दौलतराव कुंभार).
संत गोरा कुंभार (लेखक – निवृत्ती वडगांवकर)
संत गोरा कुंभार वाङमय दर्शन (लेखक – बाबुराव उपाध्ये)
गोरा कुंभार (लेखक – प्रा. बाळकृष्ण लळीत)
संत गोरा कुंभार (लेखक – महादेव कुंभार)
संत गोरा कुंभार (लेखक – मा.दा. देवकाते)
श्री गोरा कुंभार चरित्र (लेखक – वीणा र. गोसावी)
विलास राजे यांनी लिहिलेला संत गोरा कुंभार यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथ, ’जीवनमुक्त’ हा २५-५-२०१३ रोजी, डॉ. रामकृष्णदास लहिवतकर यांच्या हस्ते चिंचवडमध्ये प्रकाशित झाला.
म्हणे गोरा कुंभार (लेखक – वेदकुमार वेदालंकार)
गोरा कुंभार (लेखक – स.अ. शुक्ल)
संत गोरा कुंभार यांच्यावरील चित्रपट
’भगत गोरा कुंभार’ नावाचा हिंदी चित्रपट १९७८मध्ये निघाला होता. दिग्दर्शन दिनेश रावल यांनी केले होते.
संत गोरा कुंभार नावाचे मराठी नाटक होते. त्यात प्रसाद सावकार यांनी गोरोबांची भूमिका केली होती. लेखन अशोकजी परांजपे यांचे होते.
‘संत गोरा कुंभार’ मराठी चित्रपट (दिग्दर्शक – राजा ठाकूर)
संगीत संत गोरा कुंभार (मराठी नाटक, लेखक:- अशोकजी परांजपे; दिग्दर्शक – मिलिंद टिकेकर) : रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचाने अहमदनगर येथे भरलेल्या ५८व्या नाट्य संमेलनात सादर केलेल्या या नाटकाला ‘हौशी संगीत नाटका’साठीचा प्रथम पुरस्कार मिळाला.
(क्रमश:)
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७