इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग २)
संत ज्ञानेश्वर : काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती!
ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे चरित्रात्मक तपशील त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांच्या लिखाणात जतन केलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांची महतीच एवढी मोठी आहे की त्यांच्याविषयी काय लिहावे आणि काय नाही, असा प्रश्न उपस्थित होतो…..
जीवनचरित्र
ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र सर्वविदित आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठावरील आपेगाव गावातील कुलकर्णी होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत वाराणसीच्या यात्रेला गेले होते. तेथे ते एका आध्यात्मिक गुरूला भेटले आणि त्यांनी पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरू रामा शर्मा यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली.जेव्हा त्यांना समजले की, विठ्ठलपंतांनी आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे, तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची सूचना केली. विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाबाईंनी चार मुलांना जन्म दिला – निवृत्तीनाथ (१२७३), ज्ञानेश्वर (१२७५), सोपान (१२७७) आणि मुक्ताबाई (१२७९).
तत्कालीन ब्राह्मणांनी प्रायश्चित्त म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंतांना केली. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता येईल या आशेने इंद्रायणी नदीत उडी मारून एका वर्षातच आपला जीव दिला. परंतु तरीही त्यावेळच्या कर्मठ ब्राह्मणांनी या चारही भावंडाना सन्याशाची मुलं म्हणून अतोनात त्रास दिला.
ज्ञानेश्वरी : ज्ञानेश्वरांचे महान कार्य
ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
तीर्थयात्रा
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात.
‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
चमत्कार
ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य सच्चिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन. दुसरा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि ती म्हैस वेद म्हणू लागली.आणखी एका चमत्कारात भिंतीवर स्वार होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवले. नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले.
संजीवन समाधी
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.
प्रभाव आणि वारसा
दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त हे आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारी नावाच्या वार्षिक यात्रेत सामील होतात. या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात. ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी-संतांना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली.
पालखी :
आषाढ महिन्यात आळंदी वरून दरवर्षी पंढरपूर कडे पालखी च प्रस्थान होत अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे त्यावेळी मंदिराचा कळस हल्ल्याशिवाय माउलींच्या पालखीचं प्रस्थान होतं नाही’
ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला-
ज्ञानेश्वरांचे आणखी एक महान कार्य म्हणजे वारकरी संप्रदायाची उभारणी त्यांनी केली
वारकरी संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे निश्चित सांगता येत नाही. संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) ‘संतकृपा जाली । इमारत फळा आली’ ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
‘ज्ञानदेवे रचिला पाया’ ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ह्याचा अर्थ ह्या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले, तसेच त्यांच्या रूपाने ह्या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत येऊन मिळाला, असा घेता येईल.
वर्णाश्रमधर्माच्या चिवटपणाचा अत्यंत कटू अनुभव ज्ञानेश्वरांना, त्यांच्या आईवडिलांना आणि भावंडांना आलेला होता. समाजाने झिडकारणे किती दुःखद असते, ह्याचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला होता आणि ह्यातूनच समाजातील शुद्रातिशूद्रांबद्दल त्यांच्या मनात अपार करूणा निर्माण झाली. वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेला आणि’ब्रह्यविद्येचा सुकाळू’ करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सर्वांसाठी मराठी भाषेत लिहिला. अध्यात्मविद्या ही काही मूठभरांची मक्तेदारी नसून सामान्यांतला सामान्य माणूसही ती आत्मसात करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी पारंपरिक समाजव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या माणसांतही निर्माण केला.
ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा नाथपंथीय होती. अद्वयानंदाचे वैभव, अष्टांगयोग, दलितांच्या उद्धाराची प्रेरणा आणि देशी-मराठी-भाषेचा पुरस्कार, हा नाथपंथाचा प्रभावशाली वारसा होय. शांकर वेदान्त आणि काश्मिरी शैवमताचे संस्कारही त्यांच्यावर होते. तथापि ह्या संस्कारांतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जीवनाविषयक दृष्टिकोण निर्माण केला. ज्ञानदेवांचेच समकालीन नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होत. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली.
महाराष्ट्राबाहेरही त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भक्कम पाया मिळवून दिला.
नामदेवांची भूमिका तत्वचिंतकाची नसली, तरी लडिवाळ लेकराने मातेवर प्रेम करावे, तशी ईश्वरभक्ती करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजनसमाजाच्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आत्माविष्काराची वाट मोकळी करून दिली.
विठ्ठलभक्तिने भारलेले विविध जातींचे लोक विठ्ठलभक्तिने भारावलेल्या रचना करू लागले. गोरा कुंभार (१२६७-१३१७), सावतामाळी (१२५०-९५), नरहारी सोनार (मृ.१३१३), चोखामेळा (मृ.१३३८), सेना न्हावी (तेरावे शतक) इ. संतांची एक मालिकाच उभी राहिली. वेगवेगळ्या व्यवसायांतले हे संत होते आणि त्यांनी आपल्या अभंगरचनेसाठी आपापल्या व्यवसायातली परिभाषा वापरली वा आपापल्या व्यवसायांचे संदर्भ दिले.
(क्रमश:)
-विजय गोळेसर मोबा ९४२२७६५२२७