इंडिया दर्पण विशेष लेखमाला
वारी पंढरीची (भाग १०)
दामाजींसाठी
||झाला महार पंढरीनाथ||
मंगळवेढा हे एक तालुक्याचे स्थान आहे आणि तेथे अनेक संत होऊन गेले आहेत. संत कान्होपात्रा, संत चोखोबा, संत गोपाबाई आणि त्यातीलच एक संत दामाजीपंत हे आहेत. पंधराव्या शतकातील दामाजीपंत हे विठ्ठलाचे भक्त होते मंगळवेढा या गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये लोक अन्नासाठी पाण्यासाठी त्रासले होते. दामाजी पंत यांनी त्यांच्या ताब्यात असलेली बादशहाची धान्याची कोठारे गावकऱ्यांसाठी खुली केली होती. मात्र त्यांना बादशहाने बंदी बनवण्यासाठी शिपाई पाठवले असता, पांडुरंगाने त्यांची जमानत भरल्याचे सांगितले जाते.
पंधराव्या शतकात होऊन गेलेले दामाजीपंत हे मंगळवेढा या गावचे रहिवासी होते. मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असून मंगळवेढ्याचे नाव चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरून पडले असे म्हणतात. दामाजीपंत हे बिदर येथील मोहम्मद शहाच्या दरबारात सेनापती होते. त्यांनी अब्दुल शहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले. त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदार पदी नेमणूक झाली. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली.
शके 1376 मध्ये दुर्गा देवीचा भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा 1377 साली पाऊसही नाही झाला. त्याच्या पुढच्या वर्षात पण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली. जनता भुकेने त्रासली, पाण्यासाठी तडफडत होती. दामाजीपंत हे राज्याचे महसूल अधिकारी होते. त्यांचे धोरण उदारमतवादी होते.
दामाजीपंत पंढरपूर जवळील मंगळवेढे येथे राहत होते. एकदा एक ब्राह्मण दामाजी यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. दामाजीजीनी त्याला आपल्या घरी आमंत्रित करून आणि रात्रीचे जेवण दिले. ते अन्नधान्य पाहून ब्राह्मण दुःखाने खाली पडला आणि आपल्या भुकेलेल्या कुटुंबाच्या दुःखा विषयी त्या ब्राह्मणाने दामाजीपंत यांना सांगितले. नंतर दामाजीपंत यांनी त्यांना पंढरपुरात नेऊन सोडले व त्यांच्या कुटुंबासाठी अन्न पाठवण्याची व्यवस्था केली. दामाजीचे सेवक पंढरपुरातल्या ब्राह्मणाच्या कुटुंबासाठी दोन भारी धान्य देण्यासाठी गेले. पण दुष्काळग्रस्त शहरातील लोकांनी धान्य पळवून लुटले. या दुष्काळात बादशहाच्या परवानगी शिवाय धान्याची कोठारे जनतेसाठी खुली करून दिली.याचा अर्थातच सुलतानाला खूप राग आला.
दामाजी कडून धान्याचे पैसे परत घेण्यासाठी किंवा दामाजीला बिदरला बंदी बनवण्यासाठी त्याने आपले सैनिक पाठवले. दामाजी बादशहाच्या भेटीसाठी निघाले. वाटेत त्यांनी पंढरपुर येथील पांडुरंगाचे दर्शन घेतले. दामाजीपंत हे बादशहा पर्यंत पोहोचले, तेव्हा बादशहाने त्यांना मिठी मारली. कारण त्यांनी जे धान्य भुकेल्या जनतेला दिले होते. त्या धान्याच्या बदल्यात पांडुरंगाने एका महाराचे रूप घेऊन त्याबद्दल बादशहाला पैसे दिले होते.
त्यांच्याविषयीची दंतकथा अशी आहे की, त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली. त्यामुळे दामाजीपंतांना बीदर दरबारात हजर झाल्यावर बादशहाने त्याचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले.
तुमच्या विठू महाराने पैसे पोहोचते केल्याचे बादशहाने सांगितले. दामाजी पंत यांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते? याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पंढरीच्या पांडुरंगाने आपल्यासाठी महाराचे रूप घेतल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व राहिलेले आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळ पिडीत लोकांची त्यांनी सेवा केली, म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले.
असाच प्रसंग संत विसोबा खेचर यांच्या बाबतही घडला होता. महिपतबुवा ताहराबादकर यांनी विसोवा सराफांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे त्यात हा प्रसंग वर्णन केला आहे.
जेव्हा जेव्हा दुष्काळ पडत असते तेव्हा तेव्हा विसोबा सराफांच्या जवळ जे काही असेल ते दुष्काळपीड़ितांना वाटून देत. असे असूनही अनेक लोक भुकेने प्राण सोडत. विसोवांनी विचार केला की माझी एवढी पत आहे की मला कुणीही कर्ज देईल. का न कर्ज काढून भुकेल्यांचे पोट भरू? जेव्हा अकाल संपेल तेव्हा ते कर्ज फेडता येईल. त्यांच्या पत्नीलाही हा विचार पसंत पडला. विसोवांनी एका पठाणाकडून कर्ज घेतले, आणि त्यातून अन्न विकत घेऊन ते भुकेलेल्यांना वाटू लागले.
कुणीतरी चुगली केली आणि पठाणाला विसोवा दिवाळखोर झाल्याची बातमी कळवली. पठाण बिथरला आणि त्याने विसोवा सराफांना सात दिवसाच्या आत कर्जाची परतफेड करायला सांगितले. मुसलमानी राजवटीत पठाणांचेच म्हणणॆे ऐकले जात असे, न्याय वगैरे काही नव्हता. विसोवा सराफांच्याकडे काहीच नव्हते, ते कुठून कर्ज फेडणार?
जेव्हा कर्ज चुकवण्याची काहीही व्यवस्था होऊ शकली नाही, तेव्हा पठाण विसोवा सराफांवर क्रूर अत्याचार करून त्यांना अपमानित करू लागला. विसोवांनी सर्व मुकाटपणे सहन केले. ते फक्त एवढेच सांगत की ‘मी आपले कर्ज घेतले आहे, जेव्हा जमेल तेव्हा मी ते सव्याज फेडीन.’
विसोवा सराफांचे हाल पाहून विसोवांच्या मुनीमाने आपली सर्व स्थावर मालमत्ता विकून व जवळची सर्व पुंजी देऊन पठाणाचे कर्ज फेडले. त्यानंतर तो मुनीम विसोवा सराफांच्या साथीने परोपकार करू लागला आणि ईश्वर भक्तीत रममाण झाला.
‘झाला महार पंढरीनाथ’ नावाचा मराठी चित्रपट
संत दामाजी यांच्या जीवनात घडलेल्या या प्रसंगावर १९७० साली :कॉसमॉस फिल्मस कृत ‘झाला महार पंढरीनाथ’ नावाचा मराठी चित्रपट आला होता.या चित्रपटाचे दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. सिन्नरच्या प्रताप टाकिज मध्ये हा चित्रपट पाहिल्याचे आठवते. तेंव्हा पासून संत दामाजी मनाच्या गाभार्यात स्थानापन्न झाले आहेत.
या चित्रपटाचे कथासूत्र असे होते. खरं तर दामाजी ठाणेदार,पण आपल्या गोड वाणीने आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी गावकऱ्यांना जिंकून घेतले. महारवाड्याचीही त्यांनी कधी उपेक्षा केली नाही.पण ही दलीतसेवा ग्रामाधिकाऱ्यांना पसंत नव्हती.त्यामुळे दुर्गादेवीचा दुष्काळ पडताच त्यांनी दामाजीवर खापर फोडले. गावासाठी दामाजीनी बादशहाकडे धान्य मागितले.पण गावच्या दुष्ट मुजुमदाराने धान्याच्या गाड्या लुटल्या.लोक चिडले.तेव्हा विठ्ठलाला साक्षी ठेवून दामाजीपंतांनी धान्याचे कोठार खुले केले.राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना पकडले जाते.पण बादशहाला त्यांच्या भक्तीचा साक्षात्कार होतो आणि तो त्यांना सोडून देतो.
या चित्रपटात कलाकार होते गुलाब मोकाशी, जयशंकर दानवे, जोग, नर्गिसबानू, पद्मा चव्हाण, बी. माजनाळकर, मंगला शेट्ये, राज शेखर, रामचंद्र वर्दे, शांता तांबे, शाहू मोडक, संध्या कुलकर्णी, सरोज सुखटणकर
या चित्रपटातील ‘नीज रूप दाखवा हो. .’हे गीत मला आजही आवडते. ग.दि. माडगूळकर यांनी गीतलेखन केले होते. तर पार्श्वगायक होते सुधीर फडके, आशा भोसले, मधुबाला चावला, सुषमा पैंगणकर आणि वसंतराव देशपांडे. संगीत दिले होते सुधीर फडके यांनी.
दामाजींची समाधी
दामाजी पंत 1382 वैकुंठवासी झाले. त्यांची समाधी साध्या स्वरूपात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम यांनी ते घुमट वजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल रखुमाई व दामाजीपंतांची मूर्ती स्थापन केली आहे.
पेशवाईच्या काळात मंगळवेढा हे सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांच्या अंमलाखाली गेले ‘संत दामाजी संस्था’ एक एकर एकोणीस गुंठे जागेवर आहे. मंदिराला मोठा सभामंडप आहे. तेथे दररोज दोनशे-अडीचशे लोकांना जेवण दिले जाते. चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघ वारीला तेथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी दोन मजली इमारत बांधली आहे. वारकऱ्यांना भात व साराचे जेवण दिले जाते. एका वारीसाठी (पंधरा दिवसांसाठी) तीस-पस्तीस क्विंटल तांदूळ लागतात.
दरम्यान तेथे अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. तो खर्च भक्त व दानशूर लोकांच्या देणग्यांतून भागवला जातो.
(क्रमश:)
- विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७