जामनगर (गुजराथ) – अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या वनतारा या देशातील अग्रगण्य वन्यजीव बचाव व संवर्धन उपक्रमाने “इंट्रोडक्शन टू कंझर्वेशन मेडिसिन” या प्रमुख पशुवैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात देशभरातील ५४ पशुवैद्यक सहभागी झाले आहेत.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. व्ही. क्लेमेंट बेन (सदस्य सचिव, केंद्रीय प्राणी उद्यान प्राधिकरण), श्री. दिग्विजय सिंह खाती (माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक, उत्तराखंड), डॉ. प्रदीप के. मलिक (माजी प्राध्यापक, वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) आणि डॉ. बृज किशोर गुप्ता (संचालक, ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणादरम्यान वन्यजीव आरोग्य व्यवस्थापन, आपत्कालीन उपचार पद्धती, रोगनियंत्रण, निदानशास्त्र व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यावर तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच वनताराच्या अत्याधुनिक रुग्णालय व संवर्धन केंद्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सत्रे घेण्यात येणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी डॉ. बृज किशोर गुप्ता म्हणाले, “वन्यजीव संवर्धनासाठी सक्षम पशुवैद्यकीय नेटवर्क उभारणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती व व्यावहारिक कौशल्यांचा अनुभव मिळाल्याने प्राण्यांच्या दीर्घकालीन आरोग्यसेवेत सकारात्मक बदल घडेल.”
“हिलिंग द वाइल्ड” या वनताराच्या प्रमुख उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाच्या समारोप सत्रात (२० ऑगस्ट रोजी) सर्व सहभागी पशुवैद्यकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.