नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-कळवण रस्त्यावरील वणी जवळ मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडण्यात आल्या होत्या. ट्रॅक्टरचालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने या दोन्ही ट्रॉली अचानक अल्टो कारवर उलटल्या. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले सर्व जण हे रस्त्याचे काम करणारे मजूर आहेत. हे सर्वजण उंदिरखेडा (ता. पारोळा, जि. जळगाव), हिंगोणा (ता. धरणगाव, जि. जळगाव) आणि कुसुंबा (ता जि. जळगाव) येथील आहेत. कारचालकांना ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होत असल्याचा अंदाज आल्याने कारमधील व्यक्तींनी कार सोडून पळ काढला. आणि क्षणार्धात दोन्ही ट्रॉली कारवर कोसळल्या. तसेच बारीतून खाली कोसळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. तसेच, या मजुरांचे घरगुती सामानासह मजूर फेकल्या गेल्या. रस्त्यापासून खोल असलेल्या बारीत अनेक मजूर फेकले गेले.
या अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर, १५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. अपघातामुळे काही वेळ दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आणि अॅम्ब्युलन्सचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर जलदगतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. सहाही मृत हे उंदिरखेडा गावचे आहेत. त्यात २ पुरुष, २ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे.