नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चौसाळे फाट्याजवळ पिकअप वाहनाला हा अपघात झाला आहे. पिकअपमध्ये मजुरांना नेले जात होते. या भीषण अपघातात ८ महिन्यांच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झला आहे. तर १० ते १२ मजूर जखमी झाले आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मायेलकींसह एका महिलेचा मृत्यू झाला तर १० ते १२ प्रवासी मजूर जखमी झाले आहेत. गुजरात येथील काही मजूर निफाड तालुक्यात मोलमजुरी करतात. नांदूरमध्यमेश्वर परिसरात ते सध्या काम करीत होते. तेथून ते सुरगाणा मार्गे गुजरातला जात होते. वणी-सापुतारा मार्गावर सुरगाणा तालुक्याकील हिरडपाडा येथे चौसाळे फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.
हे सर्व मजूर पिकअप वाहनाने गुजरातकडे जात होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पिकअप थेट वडाच्या झाडावर आदळली. या अपघातात दोन महिला आणि एक लहान बालिका यांचा मृत्यू झाला आहे. अर्चना विशाल म्हसे, मीना सोमा गुंबाड, रिहान विशाल म्हसे अशी तिघा मृतांची नावे आहेत. माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व जखमींना बोरगाव आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. तर, ९ जणांना पुढील उपचारासाठी गुजरातच्या अहवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
Vani Saputara Highway Accident 3 Death