नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंगी गडावर आजपासून २६ सप्टेंबरपर्यंत ४ दिवस सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. २३ ते २६ सप्टेंबरपर्यंत हे चार दिवस काम सुरु राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी घाटात दरड प्रतिबंधक जाळी बसविण्याचे काम पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यात येत आहे. याबाबतची माहिती कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली.
या दुरुस्ती कामात घाटातील सैल दगडही काढले जाणार आहेत. अनेकदा दरड कोसळून वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम युध्द पातळीवर सुरु आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीमध्ये गडावर येण्याचे भाविकांनी टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.