पुणे – राष्ट्र-संस्कृती-समाज यांना एका सूत्रात बांधून ठेवणाऱ्या ‘वन्दे मातरम्’ या महामंत्राचा समग्र इतिहास विशद करणाऱ्या ग्रंथांचे प्रकाशन, या मंत्र-गीताच्या अवतरण दिनी, पुण्यात संपन्न झाले. साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन) यांच्या पुढाकाराने प्रकाशित हा सुमारे ८५० पृष्ठांचा ग्रंथ, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू . स्वामी गोविंददेव गिरी महाराज त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि प्रसिद्ध प्रवचनकार पू . स्वामी गोविंददेव गिरी महाराज याप्रसंगी म्हणाले की, कोणतेही राष्ट्र तीन पैलूंवर उभे राहते; राष्ट्रासाठी भूमी हवी, संस्कृती-परंपरा हवी आणि या संस्कृतीचे पालन करणारा समाज हवा. ‘वन्दे मातरम्’ या महामंत्राने या तिन्ही पैलूंना एका धाग्यात बांधण्याचे कार्य केले आहे. भारतमातेचे वन्दन आणि तिचे आराधन करणारा हा मंत्र जोपर्यंत गायला जाईल, तोपर्यंत हे राष्ट्र ‘मृत्युंजय राष्ट्र’ म्हणून जीवंत राहील, असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला.
वन्दे मातरम् च्या अवतरण दिनाचे (कार्तिक शुद्ध नवमी, ७ नोव्हेंबर १८७५) औचित्य साधून, पुण्यातील अभ्यासक मिलिंद सबनीस आणि त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा यांनी सिद्ध केलेल्या सुमारे ८५० पृष्ठांच्या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन स्वामीजींच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, साप्ताहिक विवेक – हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक समुहाचे समन्वयक महेश पोहनेरकर, हिन्दी ग्रंथाचे अनुवादक आणि पत्रकार गंगाधर ढोबळे आदी उपस्थित होते.
स्वामीजी म्हणाले, आमच्या संस्कृतीने भारत भूमीला ‘मातेचे’ स्थान दिले आहे, तो जमिनीचा तुकडा नाही. ती साक्षात चैतन्य आहे. ती आमचे भावजीवन आहे. म्हणूनच तिला वन्दन करणाऱ्या वन्दे मातरम् या स्फुल्लिंगाने एक इतिहास, एक समाज उभा केला. या गीतात भारतमातेसाठी सुलजाम्, सुफलाम् , सुहासिनी, सुमधुर भाषिणी अशी गुणविशेषणे गायली आहेत. हे शब्द सार्थ करण्यासाठी सर्व भारतवासीयांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. तसेच ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
ग्रंथ निर्मितीचा प्रवास
“समग्र वन्दे मातरम्” या ग्रंथाच्या निर्मितीचा प्रवास मोठा स्फूर्तिदायक आहे. लेखक मिलिंद प्रभाकर सबनीस हे पुण्यातील ज्ञानदा प्रतिष्ठानच्या शाळेतील कलाशिक्षक. १९९४ मध्ये वन्दे मातरम् चे जनक ऋषि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देण्याच्या निमित्ताने त्यांनी संदर्भ शोधण्यास सुरुवात केली आणि तेथून या प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यासाठी बंकिमचंद्र ह्यांच्या जन्मगावापासून ( नैहाटी, बंगाल ) ते संपूर्ण देशभर त्यांची भटकंती झाली.
गेल्या १०० वर्षांतील हजारो मूळ कागदपत्रे, लेख, छायाचित्रे, वंदे मातरम् गायनाच्या मूळ ध्वनि मुद्रिका, स्वर लिपी त्यांनी गोळा केल्या. अनेक ज्येष्ठ अभ्यासकांच्या मुलाखती, देशातील प्रमुख वाचनालये येथे धांडोळा घेतला. व्याख्याने दिली. आणि यातून तयार झाले ८०० पृष्ठांचे दोन खंड — “समग्र वन्दे मातरम् : इतिहास आणि संकलन”. दोन दशकांच्या त्यांच्या तपश्चर्येला साथ दिली, साप्ताहिक विवेकने. आणि या दोन खंडांचे प्रकाशन २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या हस्ते झाले.

वन्दे मातरम् चा हा प्रवास येथेच थांबला नाही. तर हे मराठी ग्रंथ राष्ट्रीय पातळीवर, राष्ट्र भाषेतून प्रकाशित व्हावेत यासाठी मिलिंद सबनीस आणि त्यांच्या पत्नी सौ.शिल्पा ( मूळच्या नाशिकच्या) पुन्हा सज्ज झाले. साप्ता. विवेकने पुढाकार घेतला. हिंदी विवेकचे संपादक गंगाधर ढोबळे यांनी निरपेक्षपणे आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अनुवाद संपन्न केला. ‘समग्र वन्दे मातरम्’ हा खरोखर राष्ट्रीय ठेवा असावा, असा हा ग्रंथराज आहे. वन्दे मातरम् चा जन्म, त्याचे गुरुदेव रवीन्द्र नाथ टागोर यांनी केलेले पहिले जाहीर गायन, पूर्णयोगी श्रीअरविंद ह्यांनी त्याला दिलेली मंत्रमयता, त्यानंतर देशात झालेली विलक्षण जागृती असा इतिहास आणि वाटचाल, हजारो दुर्मिळ कागदपत्रे आणि छायाचित्रांच्या आधारे यात मांडलेली आहे. वन्दे मातरम् या दोन शब्दांनी स्वातंत्र चळवळीचा इतिहासच बदलवून टाकला, इंग्रजांच्या सत्तेला हादरवून सोडले.
मिलिंद सबनीस यांच्या या ग्रंथात वन्दे मातरम् चे विविध भारतीय भाषांमध्ये झालेले अनुवाद, भारतमातेसाठी अभिव्यक्त झालेल्या विविध भाषांमधील गद्य आणि पद्य रचना, ऋषी बंकिमचंद्र यांचे चरित्र, आनंदमठ ही कादंबरी, वन्दे मातरम् च्या सार्वजनिक गायनातून निर्माण झालेले वाद, चर्चा, सुमारे १०० वर्षापासून गायल्या गेलेल्या या गीताच्या दोनशेवर रचना – स्वर लिपींची यादी यात आहे. हा ग्रंथ देशातील अन्य भाषातून अनुवादीत व्हावा, अशी सबनीस यांची तळमळ आहे.