इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोलाः राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. या वेळी त्यांनी राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाजही व्यक्त केला.
२८८ सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० तारखेला एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. तूर्त राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला अवघे २ दिवस शिल्लक असताना आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, की राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणीही कुठेही जाऊ शकते. आम्हालाही सद्यस्थितीत पाहता सत्तेसोबत जाणे महत्त्वाचे वाटते. आमच्यापुढे निवडणूक निकालानंतर महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसोबत जाण्याचे पर्याय खुले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झाल्या होत्या. आंबडेकर स्वतः शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेही होते; पण अचानक त्यांच्यात वितुष्ट आले आणि ‘वंचित’ने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचाही आरोप होतो. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे.
आंबेडकर यांनी या वेळी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या मुद्याचाही समाचार घेतला. भाजपकडे विकासाचा कोणताच मुद्दा उरला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच त्यांच्याकडे ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणांचा वापर केला जात आहे, असे ते म्हणाले. आंबेडकर यांनी या वेळी माध्यमांवर ‘वंचित’कडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याचाही आरोप केला.