छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी असली तरी चोरी-छुपे हा प्रकार होत आहे. आता तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात होते. या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे यातील आरोपी डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्य चक्क चारचाकी गाडीतून घेऊन फिरत होता. फोन केल्यावर तो थेट घरी येऊन गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. मात्र या गैरप्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून या डॉक्टरासह त्याच्यासोबत असणाऱ्या नर्सला ताब्यात घेतले आहे.
दोघे ताब्यात
गर्भलिंग निदान चाचणी करणारे डॉ. सुनील राजपूत (रा. सिडको, छ. संभाजीनगर ), पूजा भालेराव (रा. सिल्लोड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टर आणि नर्सचे नावे आहेत. वाळूज भागात डॉ. राजपूत हा फिरते गर्भलिंग निदान रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळताच संबंधित डॉक्टरास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका महिलेस डॉ. राजपूत याच्याशी संपर्क करायला लावून गर्भलिंग निदान चाचणी करायची आहे, असे सांगितले.
राजपूतने गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी होकार देताच पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचासमक्ष वाळूज भागात सापळा रचला. संबंधित महिलेस घेऊन डॉ. राजपूत व पूजा भालेराव हे दोघे वाळूजला त्या महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल मशिनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी सुरु केली. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकासह वैद्यकीय पथकाने लगेच छापा मारुन डॉ. राजपूत आणि पूजा भालेराव या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत लपूनछपून गर्भलिंग निदान चाचण्या करण्यात येत होत्या, मात्र थेट फिरते गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गोरखधंदा उजेडात…
गर्भपात कायद्याचा गर्भ लिंग चाचणी करून गेल्या काही वर्षांत गैरवापर करण्याचे प्रमाण वाढल्याचे प्रकर्षांने जाणवते. मुलगा की मुलगी याची तपासणी झाल्यावर अनेक महिलांनी गर्भपाताचा निर्णय स्विकारला. यामुळे गर्भ लिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला. गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार बंदी असताना अनेक ठिकाणी केवळ पैशांसाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा कारवाईतून समोर आले आहे.
बीडमध्ये सर्रास
मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात एका मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता . या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन, त्यांच्याकडून चारचाकी आणि गर्भलिंग निदान यंत्रणा जप्त करण्यात आली होती. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात तर काही वर्षांपूर्वी एक मोठे उघड झाले होते. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील या वर्षी अशा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा वाळूज परिसरात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्यासह एक चार चाकी वाहनही जप्त केले आहे. गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उजेडात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Valuj Mobile Sex Determination Centre Burst