इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यात त्याचा आरोपी क्रमांक एक म्हणूनही उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला असून त्यानंतर विष्णू चाटे हा दुस-या क्रमांकाचा आरोपी आहे. यात २९ नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरुन वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुळे, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.
या हत्या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांनी पाच महत्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरोधात सर्व गुन्हे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॅासिटी आणि संतोष देशमुख हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख केला आहे.