नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शाळेतून घरी आलेल्या जुळ्या भावांपैकी एकजण गावाशेजारीच असलेल्या वालदेवी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता पोहता न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपळगाव खांब येथे सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव अंकुश राजाराम बोराडे (वय १५) असे असून त्याच्या पश्चात आई आणि एक जुळा भाऊ आहे. शाळेतून पेपर देवुन घरी आलेला अंकुश हा गावालगतच असलेल्या वालदेवी नदीच्या पात्रातील पाण्यात इतर मुलांसोबत पोहण्यास गेला होता. मात्र त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अंकुश पाण्यात बुडाला. इतर मुलांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी पाण्यात बुडालेल्या अंकुशला पाण्याबाहेर काढले. त्यांनतर स्थानिक नागरीकांच्या सहकार्याने त्याला तात्काळ पालिकेच्या बिटको रुग्णालयात व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. धूम यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. अंकुशच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात पिंपळगाव खांब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सातभाई पुढील तपास करीत आहेत.