नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. कोरोना आणि निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये त्या निकालाकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. तो निकाल आहे इस्रोमध्ये पूर्वी काम करणाऱ्या डॉ. शंकरलिंगम नम्बी नारायण ह्या शास्त्रज्ञाबद्दल.
सरकारी यंत्रणेच्या बेपर्वा वृत्तीने आणि राजकारणाच्या तडाख्यात सापडल्यामुळे एका हुषार शास्त्रज्ञाची स्थिती किती दुर्दैवी होऊ शकते याची भेदक कहाणी डॉ. नम्बी नारायण यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते आहे.आता ऐंशी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेले डॉ. नम्बी हे तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल इथल्या एका मध्यमवर्गीय तमिळ ब्राह्मण कुटुंबात तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील तिरुरुंगुडी गावात त्याच्या कुटुंबाचे मूळ सापडते.
इस्त्रोचे दुसरे एक वैज्ञानिक वाय. एस. राजन हे त्यांचे प्रारंभिक शाळेतले सहाध्यायी होते. डॉ. नम्बी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्याकाळात नव्याने विकसित होत असलेल्या अंतराळ संशोधनाच्या कार्याकडे आकर्षित झाले. १९६६ साली थिरुअनंतपुरमच्या थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवर इस्त्रोचे तत्कालीन अध्यक्ष विक्रम साराभाई यांची डॉ. नम्बी यांनी प्रथम भेट घेतली. त्यावेळी साराभाई केवळ उच्च पात्र व्यावसायिकांनाच घेत असत. त्यामुळे आपल्याकडे ती पात्रता असावी. ह्या उद्देशाने डॉ. नम्बी . यांनी थिरुअनंतपुरमच्या महाविद्यालयात एम टेकसाठी प्रवेश घेतला.
कोणत्याही नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतल्यास डॉ. नम्बी यांना त्या काळासाठी रजा देण्याला साराभाईंनी मान्यता दिली. त्यानंतर डॉ. नम्बी यांनी नासाची फेलोशिप मिळविली प्रिन्स्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे मास्टर प्रोग्राम पूर्ण केला. अमेरिकेत नोकरीची ऑफर असूनही ते भारतात परत आले. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला नारायणन यांनी भारतामध्ये द्रव इंधन रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली दिली. इस्त्रोच्या भावी अंतराळ कार्यक्रमांसाठी द्रव इंधन असणार्या इंजिनची गरज निर्माण होणार असल्याचे लक्षात घेऊन त्यावर डॉ. नम्बी यांनी लक्ष्य केंद्रित केले. एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या मध्यावर त्यांनी पहिले थ्रस्ट इंजिन बनवले. त्यांच्या टीमने विकसित केलेले इंजिन इस्रोच्या अनेक रॉकेट्स मध्ये विशेषतः पीएसएलव्हीमध्ये वापरले जाते. हे तंत्रज्ञान चंद्रयान-१ मध्येसुद्धा वापरले गेले. जीएसएलव्ही मध्येही त्याचा वापर होतो.
१९९० च्या सुमारास अंतराळ क्षेत्रासाठी अत्यावश्यक समजले जाणारे क्रायोजेनिक इंधन-आधारित तंत्रज्ञान मिळवण्यात अडचणी यायला लागल्या. रशियाने ते तंत्रज्ञान द्यायचे सुरुवातीला कबूल करून नंतर अमेरिकेच्या दडपणाखाली ते आपल्याला द्यायला नकार दिला. आपल्या शास्त्रज्ञांनी ते तंत्रज्ञान भारतातच विकसित करायचे प्रयत्न वेगाने सुरू केले. त्यात डॉ. नम्बी यांची भूमिका महत्वाची होती. पण इथेच त्यांचा राजकीय साठमारीत बळी गेला.
पाकिस्तानला ह्या प्रयोगाची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. त्याला जोड मिळाली केरळच्या कॉँग्रेस आणि डाव्यांच्या राजकीय लढाईची आणि त्यात भर घातली गेली केरळ कॉँग्रेसमधल्या करुणाकरन आणि ए. के अॅंटनी यांच्यातल्या सत्तासंघर्षाची. नम्बी नारायण यांचं म्हणणं आहे की भारताच्या क्रायोजनिक इंजिनचा प्रोजेक्ट लांबवण्यासाठी म्हणून हा आंतरराष्ट्रीय कट होता. डॉ. नम्बी यांना अटक करण्यात आली आणि इथूनच एका दुष्टचक्राला सुरुवात झाली.
इस्रोचे अन्य दोन शास्त्रज्ञ के. चंद्रशेखर आणि शशी कुमार यांनाही अटक झाली. त्यांच्यावर आरोप होते की, क्रायोजनिक प्रोजेक्टची ड्रॉइंग्स परदेशी व्यक्तींना विकल्या संबंधीचे आणि हेरगिरीचे. या हेरगिरीच्या केसमध्ये मालदीवच्या दोन महिला आणि बँगलोरचा एक लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनाही अटक करण्यात आली होती.
डॉ. नम्बी एकूण पन्नास दिवस जेलमध्ये होते. भारतातल्या पोलीस यंत्रणेचा आणि राजकीय नेत्यांचा अनुभव कायमच असा आहे की एखाद्याला अडकवायचं असेल तर त्यांची बाजूही ऐकून घ्यायची नाही . गुन्ह्याची न्याय्य आणि निःपक्ष चौकशी होण्याची फारशी शक्यताच नसते. डॉ. नम्बी यांचं काही एक म्हणणं केरळ पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी यांनी ऐकूनच घेतलं नाही. या संपूर्ण कालावधीमध्ये IB च्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांना दखाखान्यात दाखल करावं लागलं. या संपूर्ण काळामध्ये डॉ. नम्बी यांना त्यांच्या कुटुंबाला आणि इस्रोलाही एका अतिशय भयानक कालखंडातून जावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांना अतिशय मानहानीकारक अपमानकारक वागणूक मिळत होती.
पत्नीच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. बेजबाबदार आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थरावर जाणारे पत्रकार या सगळ्याला कारणीभूत होते. त्याचा परिणाम म्हणून नम्बी नारायण, त्यांचं कुटुंब आणि इस्रो यांना अतिशय सोसावं लागलं. इतकंच नाही तर क्रायोजेनिक इंजिनाच्या प्रकल्पाला दिरंगाई झाली.
पन्नास दिवसांच्या जेलनंतर नंबी नारायणन यांना जामीन मिळाला. दरम्यान ही हेरगिरीची केस सीबीआय इकडं सोपवली गेली. सीबीआय मात्र नम्बी नारायण यांचं ऐकून घेण्याच्या मन स्थितीत होती. अतिशय सखोल चौकशी झाली. नम्बी नारायण जे म्हणतात त्यात तथ्य आढळून आल्याचं सीबीआयने आपल्या अहवालात सांगितलं आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
केरळ सरकारनं त्यांना नुकसानभरपाई द्यावी असा निकाल देतांना कोर्ट म्हणते की ज्या लोकांनी, ज्यांनी डॉ. नम्बी यांना खोट्या आरोपात गुंतवलं आणि त्यांचा अपरिमित छळ केला, त्यांच्या मालमत्ता विकून डॉ. नम्बी यांना नुकसानभरपाई द्या, आम्हाला त्याची फिकीर नाही. सर्वोच्च न्यायालय आपल्या आदेशात म्हणते ” His reputation was dented. By this judgment it is reinstated.
डॉ. नम्बी यांच्यावर हेरगिरीचे तथाकथित आरोप केल्यानंतर ज्या पोलिस अधिकार्यांनी आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी डॉ. नम्बी यांचा अमानुष छळ केला त्या अधिकार्यांची चौकशी आणि कोणाच्या सूचनेवरून हे का़ंड रचले गेले याची चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे या निकालात आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. नम्बी यांच्या न्यायासाठीच्या लढाईतला हा अंतिम टप्पा आहे. सीबीआयने या बाबतचा रिपोर्ट तीन महिन्याच्या आत सादर करायचा आहे. डॉ. नम्बी यांच्या कहाणीवर “ रॉकेटी .. द नम्बी इफेक्ट ” हा चित्रपट आर.माधवन ह्या अभिनेत्याने तयार केला आहे. तो बघायलाच पाहिजे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!