नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आढावा घेण्याची शक्यता आहे. तसेच सोमवार (१६ मे) पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सुरक्षादल सतर्क झाले आहेत.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, नायब राज्यपाल सिन्हा दिल्ली येथे पोहोचले असून, ते काही दिवस दिल्लीतच मुक्कामी आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह जम्मू आणि काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. अमरनाथ यात्रेपूर्वी गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. ते जम्मू आणि काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेबद्दल या आठवड्यात चर्चा करण्याची शक्यता आहे.
माता वैष्णो देवी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला कटरा येथे गुरुवारी आग लागली होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू, तर २२ यात्रेकरू जखमी झाले होते. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला होता. बसमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी स्टिकी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी जम्मूमधील चडुरा तहसील कार्यालयात काम करणाऱ्या राहुल भट्ट या कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली होती.
सूत्रांच्या दाव्यानुसार, अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्था वाढविली जाणार आहे. पूर्वीच्या तुलनेत आता मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात येणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती देणार आहेत. वैष्णो देवी मंदिरातही सरकारकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहे.
दहशतवाद्यांकडून मंदिरे, काश्मिरी पंडित आणि जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांवर हल्ले केले जाण्याची शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती गेल्या काही दिवसांपासून सुरक्षायंत्रणेला मिळत आहे. दहशतवादी संघटनांनी जम्मूमध्ये आक्रमकरीत्या काम सुरू केले आहे. सुरक्षायंत्रणांसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे.