जम्मू (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – माता वैष्णो देवी भवनाजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीरतेने दखल घेत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. यामध्ये ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
राजभवन येथे झालेल्या बैठकीत भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांना तत्काळ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
माता वैष्णो देवी यात्रेसाठी आता ऑनलाइन बुकिंग अनिवार्य असेल. ऑफलाइन पावती यंत्रणा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी रेडिओ लहरींवर आधारित आरएफआयडी ट्रॅकिंग यंत्रणेचा वापर करण्यासह गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, प्रभावी गर्दी व्यवस्थापन, शंभर टक्के ऑनलाइन बुकिंग, यात्रा मार्ग विशेषतः भवन क्षेत्राजवळ गर्दी होऊ देऊ नये यासाठी प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैष्णो देवी तीर्थक्षेत्र मंडळाचे अध्यक्ष्य आणि नायब राज्यपाल सिन्हा म्हणाले, की आरएफआयडी ट्रॅकिंग यंत्रणा त्वरित प्रभावीपणे राबवावी. यासाठी तांत्रिक तज्ज्ञांना सल्ला देण्यासही सांगण्यात आले आहे. वैष्णो देवी यात्रेत सहभागी होणार्या भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी यात्रा मार्गावर तसेच भवन क्षेत्राजवळ महत्त्वाकांक्षी नियोजन त्वरित लागू केले जाणार आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी स्काय वॉक आणि झुलता पूल तयार केले जाणार आहेत.