मुंबई – एखादी चांगली संकल्पना मांडावी आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळावा यासारखा दुसरा आनंद नाही. सोशल नेटवर्कींग फोरमच्या ग्रामीण वाचनालय संकल्पनेलाही असाच उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १४ गावांमध्ये वाचनालये सुरु झाली असून अमेरिकेत स्थायिक असलेल्या योगेश कासट यांच्या पुढाकारातून आणि रियल डायनॅमीक्स या कंपनीच्या माध्यमातून अजून ३ गावांना वाचनालय सुरु होत आहेत. योगेश आणि त्यांचे रियल मधले सहकारी राहुल मोहता, संदीप शुक्ल, जेसन वेडिंबनर, साकेत शाह, योगेश डागा यासर्वांनी वाचनालयासाठी एसएनएफला सहा लाखांची आर्थिक मदत केली आहे. या मदतीतून दुर्गम भागातील तीन गावांमध्ये वाचनालय स्थापन होत आहेत.
विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने आदिवासी भागात देत असलेल्या भेटींमध्ये दुर्गम भागातील मुलांचा आणि वाचनाचा काही संबंधच येत नसल्याचे लक्षात आले. त्यातून दुर्गम भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनालये सुरु करण्याचा विचार असाच एकदा मनात आला. या विचाराला मूर्त स्वरूप देत ३ जानेवारी २०२१, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी पहिले वाचनालय सावर्णे या गावी साकारही झाले. सोशल मीडिया आणि परिचितांमधून या संकल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अनेक लोकांनी आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मृती प्रित्यर्थ इतर खर्च न करता आपल्या प्रियजनांच्या आठवणी जतन करण्यासाठी वाचनालय उभारणीत आर्थिक योगदान दिले. अशा रीतीने या प्रवासात आतापर्यंत १४ दुर्गम आदिवासी गावामंध्ये वाचनालये सुरु झाली आहेत. त्यात आता नवीन ३ गावांची भर पडणार आहे. या सर्व मोहिमेतील सर्वात आनंदाची बाब म्हणजे खेड्यांमधील शालेय विद्यार्थी तसेच तरुणांची पाऊले आता वाचनालयांमधील पुस्तकांकडे वळू लागली आहेत. रोज वाचनालयात जाणाऱ्या मुलांचे अपडेट बघून आमचा उद्देश सार्थकी लागत असल्याचे एसएनएफच्या सदस्यांना मनापासून समाधान वाटते.
याच शृंखलेत आता अमेरिकेतील रियल डायनॅमीक्स कंपनीच्या संचालकांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या वाचनालय चळवळीस भरीव मदत करून मोठेच बळ दिले आहे. लोकसहभागातून असेच पाठबळ मिळत गेल्यास १०० गावांमध्ये वाचनालये सुरु करण्याचे आमचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असा विश्वास एसएनएफचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केला. रियल डायनॅमिक्स कंपनीचे संचालक योगेश कासट, राहुल मोहता, संदीप शुक्ल, जेसन वेडिंबनर, साकेत शाह, योगेश डागा यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल एसएनएफ आणि गावकर्यांनी ऋण व्यक्त केले आहे.
एसएनएफ वाचनालय चळवळीची वाटचाल
महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळाने या संकल्पनेची उत्तम दखल घेतली आहे. आजवर रंगनाथ पठारे, राजन गवस, सुमती लांडे, उत्तमराव कांबळे, रावसाहेब कसबे, डॉ. रविराज तायडे, डॉ. दिलीप धोंडगे यांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यकांनी एसएनएफ वाचनालयांना भेटी देऊन आमच्या या मोहिमेस शुभेच्छा दिल्या आहेत. आयएएस अधिकारी डॉ. योगेश भरसट, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, माजी आयुक्त जीवन सोनवणे, उद्योजक दादा देशमुख, माधव पाटणकर, ऍड. सुनीता लाड, विनय बिरारी, योगेश पाटिल यांसारख्या अनेक मान्यवरांनी या मोहिमेस सक्रिय योगदान देऊन प्रोत्साहित केले आहे. यासोबतच Astral फाउंडेशन, अलकॉन इलेक्ट्रॉनिक्स, लायन्स क्लब कॉरपोरेट, आरटीओ बॅच २००४, आयएमए अशा संस्था भक्कमपणे एसएनएफच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
भावी पिढीसाठी टर्निंग पॉईंट
एसएनएफची दुर्गम भागातील वाचनालय चळवळ तिथल्या भावी पिढीसाठी टर्निंग पॉईंट ठरत आहे. त्यामुळे या उपक्रमात योगदान देता आले याचे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मनापासून समाधान वाटत आहे.
योगेश कासट, रियल डायनॅमिक्स, अमेरिका
आमचा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय
करोना काळात एसएनएफशी जोडला गेलो. तेंव्हापासून अनेक उपक्रमात आम्ही सोबत काम केले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील वाचनालय उपक्रमाची माहिती मिळताच त्वरित आम्ही आमचा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला.
योगेश डागा, रियल डायनॅमिकस, भारतीय प्रतिनिधी